(खेड / प्रतिनिधी)
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या अंतर्गत सर्व ग्राम शाखा पदाधिकारी यांच्या विद्यमाने विश्वरत्न, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ व्या जयंती महोत्सव सोमवारी ( दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी) भरणेनाका येथील जे.पी.जाधव, कॉंम्पलेस पटांगण येथे पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बी.एस.पवार, गुरुजी ( माजी श्रामणेर व बौध्दाचार्य व माजी तालुकाध्यक्ष) यांनी भूषविले.
यावेळी दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा खेड अंतर्गत संरक्षण विभाग म्हणजे समता सैनिक दल यांचे वतीने खेड येथील बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर भरणेनाका येथील पटांगणात खेड तालुका दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अध्यक्ष आदरणीय अरुणकुमार केशव मोरे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. याठिकाणी समता सैनिक दल यांनी धम्मध्वजास मानवंदना दिली. तसेच जिल्हा शाखा रत्नागिरी येथील संस्कार विभाग प्रमुख आदरणीय विजय जाधव गुरुजी यांनी धम्म ध्वजवंदना सुत्र पठणाने मानवंदना दिली.
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा खेड या नामफलकास आदरणीय प्रशांत धोत्रे व जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आयु.महादेव लोखंडे व सहकारी यांनी पुष्पहार अर्पण केला. भरणेनाका येथील रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच भरणेनाका येथील पटांगणात बौध्द समाज बांधव यांचे आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिल्हा शाखा रत्नागिरी येथील संस्कार विभाग प्रमुख आदरणीय विजय जाधव गुरुजी उपस्थित जनसमुदाय यांना अखंड मानव समाजाला उपयुक्त असलेले २५०० वर्षांपूर्वी तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेले त्रिसरण व पंचशील दिले. उपस्थित सर्व जनसमुहाने सामुदायिक पद्धतीने वंदना सुत्रपठण केले.
या कार्यक्रमात गिरीश गमरे.( व.ब.आ.), प्रमिला कांबळे.( महिला विभाग प्रमुख खेड तालुका.), कुमारी पल्लवी रामचंद्र जाधव, कुमारी विद्या दिपक कदम, देवानंद यादव गुरुजी ( माजी श्रामणेर व बौध्दाचार्यसंघटक खेड तालुका), ऍड.जयेश जाधव, डी.ए.जाधव ( बौध्दाचार्य, व हि.तपासनीस, खेड तालुका.), डी.एन.मोरे ( माजी श्रामणेर व बौध्दाचार्य व जिल्हा संघटक.) प्रशांत धोत्रे ( सहाय्यक निबंधक श्रेणी १ मुंबई उपनगर) या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करुन बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आढावा घेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय सादीक काझी ( अध्यक्ष संभाजी ब्रिगेड रत्नागिरी जिल्हा) यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख मार्गदर्शक व प्रवचनकार माजी श्रामणेर, बौध्दाचार्य व केंद्रीय शिक्षक तसेच जिल्हा शाखा रत्नागिरी संस्कार विभाग प्रमुख विजय जाधव गुरुजी यांनी बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.