( चिपळूण )
श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. २६ ते २८ जून २०२६ या कालावधीत चिपळूण येथील कै. राजाभाऊ रेडीज सभागृहात होणार असून उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. २६ जून रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे.
ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली आहे. पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, वयस्कर पुरुष गट, तसेच कुमार, कुमारी, किशोर आणि किशोरी अशा एकूण आठ गटांमध्ये सामने रंगणार आहेत. सन २०२६-२७ हंगामातील ही पहिली स्पर्धा असल्याने खेळाडूंना जिल्हा असोसिएशनकडे वार्षिक नोंदणी शुल्क रुपये ५० भरणे आवश्यक आहे.
स्पर्धेसाठी पुरुष व महिला एकेरी गटासाठी प्रवेश शुल्क रुपये १५०, पुरुष दुहेरी गटासाठी रुपये २००, तर कुमार, कुमारी, किशोर व किशोरी गटासाठी रुपये १०० निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक गटात किमान आठ स्पर्धक असणे बंधनकारक असून त्यापेक्षा कमी प्रवेशिका आल्यास संबंधित गटातील स्पर्धा रद्द केली जाणार आहे.
स्पर्धकांनी आपले प्रवेश अर्ज व शुल्क मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित तालुका प्रतिनिधीकडे जमा करावेत. स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट किंवा पांढरा शर्ट परिधान करणे अनिवार्य राहणार आहे. पुरुष दुहेरी गटातील सामने यंदापासून चार बोर्डांवर तीन सेट या पद्धतीने खेळविले जाणार आहेत.
या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच साईप्रकाश कानिटकर यांची प्रमुख पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली असून राज्यस्तरीय पंच सागर कुलकर्णी व शैलेश वाघाटे हे सहाय्यक पंच म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धा प्रमुख म्हणून मोहनशेठ मिरगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त कॅरमपटूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक मंडळ आणि कॅरम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

