(रत्नागिरी / वार्ताहर)
मिऱ्या–नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पात कुवारबाव बाजारपेठ वाचवण्यासाठी अखेर उड्डाणपुलाचा निर्णय घेण्यात आला असून त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. सुमारे १०१ कोटी रुपये खर्चाचा आणि १६ पिलरचा हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.
कुवारबाव बाजारपेठेवर महामार्ग प्रकल्पाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता होती. रस्ता समतल करण्यासाठी मोठा भराव टाकावा लागल्यास बाजारपेठेचे अस्तित्व धोक्यात येणार होते, अशी व्यापाऱ्यांची चिंता होती. याविरोधात व्यापारी संघटनेने सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाकडे आपली भूमिका मांडली.
या प्रक्रियेत व्यापारी संघटनेच्या प्रयत्नांना राज्याचे मंत्री उदय सामंत यांचे पाठबळ मिळाले. तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर कुवारबाव भागात उड्डाणपुलाचा पर्याय निश्चित करण्यात आला.
नवीन आराखड्यानुसार पाटबंधारे विभागापासून ते रेल्वे स्थानक परिसरापर्यंत उड्डाणपूल उभारला जाणार आहे. दोन्ही बाजूंना सुमारे ४५ मीटर रुंदीचे सर्व्हिस रोड विकसित करण्यात आले असून वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या या प्रकल्पासाठी माती परीक्षणाचे काम अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने सुरू आहे. त्यानंतर प्रत्यक्ष पिलर उभारणीचे काम गतीने सुरू होणार आहे. सर्व्हिस रोडचे काम पूर्ण झाल्यामुळे आता उड्डाणपुलाच्या मुख्य संरचनेला वेग मिळणार आहे.
या निर्णयामुळे कुवारबाव बाजारपेठेला मोठा दिलासा मिळाला असून स्थानिक व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

