(मुंबई / वृत्तसंस्था)
राजकीय व्यासपीठांवर एकमेकांवर टीकेचे बाण सोडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी एकाच मंचावर आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा नवा विषय निर्माण झाला. निमित्त होते ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात तिन्ही नेत्यांनी राजकीय टोलेबाजीसोबतच हास्यविनोदाचीही रंगत आणली. विशेष म्हणजे, दोन्ही ठाकरे बंधूंच्या दिलजमाईनंतर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते एका व्यासपीठावर एकत्र दिसले.
या ऐतिहासिक क्षणाचे छायाचित्रण करण्यासाठी माध्यमांच्या कॅमेऱ्यांची अक्षरशः गर्दी झाली. कार्यक्रमातील तिन्ही नेत्यांचे फोटो देशभरातील माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. दिवसभर विधान परिषद निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना संध्याकाळी दोन ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याने या कार्यक्रमाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमापूर्वी तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्यानेही राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मिश्किल टिप्पणी करत उपस्थितांना हसवले. “सर्वच लोक डाव्याबाजूने गेले म्हणून मी जाणीवपूर्वक उजवीकडे आलो,” असे ते म्हणाले. त्यानंतर तिन्ही नेत्यांच्या एकत्र उपस्थितीवरून सुरू असलेल्या चर्चेचा धागा पकडत त्यांनी काहींना या भेटीचा पोटशूळ का उठला, असा सवाल केला. “आम्हा तिघांना एकत्र पाहून काही लोकांना पोटशूळ का उठला माहीत नाही. पण आम्हाला मात्र एकाच मंचावर आल्याचं आश्चर्य वाटत नाही. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. वेगवेगळ्या पक्षाचे नेते आणि वेगवेगळी विचारधारा असलेले नेते एकत्र एकाच मंचावर येत असतात. आम्ही एकत्र हास्यविनोद करू शकतो. एकत्र चहाही पिऊ शकतो,” असे फडणवीस म्हणाले.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही जुन्या आठवणींचा संदर्भ देत चिमटा काढला. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरे फोन केल्यावर मुख्यमंत्री आवर्जून कार्यक्रमाला येतात, असा उल्लेख केल्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले, “२०१९ पर्यंत उद्धवजींनी जेव्हा जेव्हा फोन केला तेव्हा तेव्हा मी गेलो. २०१९ नंतर बोलावलंच नाही. नाहीतर गेलो असतो. मी वाटच पाहत राहिलो.” त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला.
फडणवीस यांनी आणखी एक कोटी करताना भाषणाच्या शेवटच्या क्रमांकाचा फायदा सांगितला. “कार्यक्रमामध्ये शेवटचं भाषण देण्याचा फायदा हा आहे की, यावर राज ठाकरे उत्तर देऊ शकणार नाहीत. त्यामुळे आजतरी मी काहीही बोललो त्यावर प्रतिषटकार येणार नाही,” असे ते म्हणाले. त्यामुळे उपस्थितांमध्ये पुन्हा हास्याची लकेर उमटली.
राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणातून राजकीय टोलेबाजीची संधी सोडली नाही. तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर आल्याची चर्चा काही जण करत असतील; मात्र राजकारणाच्या पलीकडे असलेली काही व्यासपीठे सर्वांना एकत्र आणतात, असे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय मतभेद असले तरी कला आणि संस्कृतीच्या कार्यक्रमांमध्ये एकत्र येणे ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले. कला, संगीत तसेच लग्नसमारंभासारख्या सामाजिक प्रसंगांमध्ये राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहभागी होता येते. राजकारणात दररोज टीका आणि मतभेद होत असले, तरी प्रत्येक ठिकाणी त्याच गोष्टींचा आग्रह धरण्याची गरज नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या भाषणातील विधानाचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केले. “२०२९ पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं. याच्यापुढे मी काय बोलू,” असा टोला त्यांनी लगावला. या वक्तव्यामुळे सभागृहात पुन्हा हशा पिकला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून व्यंगचित्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि टीका स्वीकारण्याची मानसिकता यावर भाष्य केले. यासाठी त्यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान लॉयड जॉर्ज यांच्याशी संबंधित एक प्रसंग सांगितला. पंतप्रधानपदाच्या जबाबदाऱ्यांचा ताण असूनही तुम्ही नेहमी हसतमुख कसे राहता, असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर सकाळी अंथरुणातून उठण्यापूर्वी आपण ‘डेली एक्स्प्रेस’ हे वृत्तपत्र वाचतो, असे लॉयड जॉर्ज यांनी सांगितले होते. त्या वृत्तपत्राच्या धोरणांशी सहमत नसतानाही त्यातील स्ट्रूप यांची व्यंगचित्रे पाहून दिवसाची सुरुवात आनंदाने होत असल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला होता.
“स्ट्रूप यांनी मला स्वतःवर हसायला शिकवलं,” या लॉयड जॉर्ज यांच्या कथित वक्तव्याचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी स्वतःवरही हसता येणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. एखाद्या व्यंगचित्रातून आपल्यावर टीका झाली म्हणून संताप व्यक्त करणे, संबंधित वृत्तपत्र बंद करण्याची भूमिका घेणे किंवा व्यंगचित्रकाराला अटक करण्याची मागणी करणे योग्य नाही. उलट, त्या टीकेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता आले पाहिजे. स्वतःच्या चुका किंवा उणिवा ओळखण्यासाठीही व्यंगचित्रांचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे टीका सहन करण्याची आणि स्वतःकडेही विनोदबुद्धीने पाहण्याची वृत्ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील शिक्षणाच्या आठवणीही सांगितल्या. तीन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर आपण महाविद्यालय सोडले आणि त्यामुळे पदवीधर झालो नाही, असे त्यांनी नमूद केले. मात्र, पदवी नसली तरी निवडणूक लढवता येते, असा मिश्किल उल्लेख त्यांनी केला. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या अर्जावर सही किंवा अंगठा करण्याचा पर्याय असल्याचे पाहायला मिळाले होते, असे सांगत त्यांनी त्या अर्जालाच व्यंगचित्राची उपमा दिली. या उदाहरणातून त्यांनी लोकशाही प्रक्रियेतील विसंगतीवरही भाष्य केले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ग्रंथालीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील व्यंगचित्रकलेचा इतिहास आणि तिचे विविध प्रवाह मांडण्यात आले आहेत. १८८० पासूनच्या व्यंगचित्रकलेचा मागोवा घेणाऱ्या या ग्रंथात गेल्या शंभर वर्षांतील नामवंत व्यंगचित्रकारांची ओळख आणि त्यांची निवडक व्यंगचित्रे समाविष्ट आहेत. सामाजिक हास्यचित्रे, पॉकेट कार्टून, कॉमिक स्ट्रिप, अर्कचित्रे, इलस्ट्रेशन आणि राजकीय व्यंगचित्रे अशा विविध प्रकारांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
राजकीय मतभेद, आरोप-प्रत्यारोप आणि परस्परांवरील टीका यांमुळे नेहमी चर्चेत असणारे तीन नेते एका सांस्कृतिक कार्यक्रमात एकत्र आले आणि त्यांनी एकमेकांवर केलेल्या मिश्किल टिप्पण्यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. मात्र, या एकत्रित उपस्थितीचा अर्थ राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला आहे, असा कोणताही निष्कर्ष या कार्यक्रमावरून काढता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कला, साहित्य आणि व्यंगचित्रांच्या व्यासपीठाला असलेले महत्त्व या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.


