(रत्नागिरी /प्रतिनिधी)
घरातील हॉलमध्ये सोफ्यावर बसलेले असताना अचानक ओरडून बेशुद्ध पडलेल्या ६२ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीत घडली. महेंद्र रामचंद्र पवार (वय ६२, मूळ रा. मात रमाईनगर, खेडशी नाका, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र पवार हे घरातील हॉलमध्ये सोफ्यावर बसलेले असताना अचानक ओरडले. आवाज ऐकून त्यांचा मुलगा शंतनू पवार आणि पत्नी यांनी हॉलमध्ये धाव घेतली. त्यावेळी महेंद्र पवार हे बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कुटुंबीयांनी विलंब न करता त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल केले. मात्र, तेथील डॉ. आकाश यांनी तपासणी करून त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ९९/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.


