( रत्नागिरी / वार्ताहर )
पर्यटनस्थळ असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील आरेवारे येथे वनविभागाने केलेल्या कारवाईत अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांचे स्टॉल जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले होते. या कारवाईमुळे येथील स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांनी आरेवारे समुद्रकिनारी संबंधित व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने चर्चा केली. यावेळी तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा स्टॉल उभारून व्यवसाय सुरू करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
आरेवारे पूल बांधण्याच्या काळापासूनच काही स्थानिक व्यावसायिक उदरनिर्वाहासाठी येथे स्टॉल उभारून व्यवसाय करत होते. या परिसरात पर्यटन वाढू लागल्यानंतर मुख्य रस्त्याच्या बाजूला हळूहळू सुमारे वीस स्टॉल उभे राहिले. समुद्रकिनारीही काही ग्रामस्थांनी पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्टॉल सुरू केले होते. मात्र, काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने सर्व स्टॉल उद्ध्वस्त केले. या कारवाईत स्टॉलधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. काही ठिकाणी कठडे बांधण्यात आल्याचे कारणही कारवाईदरम्यान देण्यात आले.
पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच ही कारवाई झाल्याने स्थानिक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर काही ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. यावेळी सामंत यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. तसेच, आपण स्वतः आरेवारे येथे जाऊन स्थानिक व्यावसायिकांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार सोमवारी तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती मोरे आणि पंचायत समिती सदस्य परेश सावंत यांनी आरेवारे पुलानजीक वनविभागाच्या कारवाईत बाधित झालेल्या स्टॉलधारकांची बैठक घेतली. यावेळी व्यावसायिकांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. कारवाईपूर्वी ज्या ठिकाणी स्टॉल सुरू होते, तेथे संबंधित व्यावसायिकांनी तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा स्टॉल उभारून व्यवसाय सुरू करावा, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.


