(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर पोलीस ठाण्यात नवनियुक्त पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, काही दिवसांपूर्वीच उपनिरीक्षक म्हणून रुजू झालेले प्रवीण देसाई यांचाही यावेळी पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पोलीस व नागरिक यांच्यात सुसंवाद वृद्धिंगत व्हावा तसेच तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने ही सदिच्छा भेट घेण्यात आली.
या प्रसंगी माजी सैनिक नावडी तलाठी संदेश घाग यांनी पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तर पत्रकार एजाज पटेल यांनी उपनिरीक्षक प्रवीण देसाई यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की, तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखणे हे पोलीस प्रशासनाचे प्राधान्य असून, यासाठी पत्रकार व नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. जनतेच्या समस्या सोडवणे आणि न्याय मिळवून देणे यावर विशेष भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास पत्रकार वहाब दळवी, नियाज खान आणि दिनेश आंब्रे उपस्थित होते. सर्व पत्रकारांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना पत्रकार नियाज खान यांनी सांगितले की, नवनियुक्त अधिकारी कर्तव्यदक्ष असून त्यांच्या अनुभवाचा फायदा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी होईल. तर पत्रकार दिनेश आंब्रे यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना न्याय व सुरक्षित वातावरण मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पत्रकार वहाब दळवी यांनीही कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी लेखणीचे सहकार्य कायम राहील, असे सांगितले.

