(पुणे / पिंपरी-चिंचवड)
डॉक्टरांना समाजात देवाचं स्थान दिलं जातं. रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या या व्यवसायाकडे विश्वास आणि आदराने पाहिलं जातं. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासला आहे. निगडीतील संभाजीनगर परिसरातील चेतना रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका महिला रुग्णाचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टर धैर्यशील शेटके याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून रुग्णालयांमधील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय महिला पाठीच्या मणक्यावरील शस्त्रक्रियेसाठी ८ जून रोजी निगडीतील चेतना रुग्णालयात दाखल झाली होती. ११ जून रोजी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ती रुग्णालयात उपचार घेत होती. दरम्यान, १४ जून रोजी पहाटेच्या सुमारास संबंधित डॉक्टर धैर्यशील शेटके यांनी महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी अयोग्य स्पर्श आणि अनुचित वर्तन केल्याचं महिलेने तक्रारीत नमूद केलं आहे.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला घाबरली आणि तिने मोठ्याने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकताच रुग्णालयातील कर्मचारी आणि तिचे नातेवाईक घटनास्थळी धावले. विशेष म्हणजे हा प्रकार महिलेच्या पतीसमोर घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांनी तत्काळ निगडी पोलिसांशी संपर्क साधला.
आरोपी डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत प्राथमिक चौकशी सुरू केली. पीडित महिलेची तक्रार नोंदवून आरोपी डॉक्टर धैर्यशील शेटके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली.
या प्रकरणाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी सांगितले की, “तक्रार प्राप्त होताच आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याची संपूर्ण पार्श्वभूमी तपासली जात असून यापूर्वी त्याच्याविरुद्ध अशा प्रकारच्या तक्रारी आहेत का, याचीही चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.”
पीडित महिलेला दुसऱ्या रुग्णालयात हलवलं
घटनेनंतर पीडित महिलेच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा विचार करून तिला पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे रुग्णालयांमधील महिला रुग्णांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उपचारासाठी दाखल झालेल्या महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणं ही रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी असताना अशा प्रकारच्या घटना चिंताजनक मानल्या जात आहेत.

