(मुंबई)
राज्यातील दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी–मार्च 2026 मधील परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले आहे. 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत संपूर्ण राज्यात 5,111 मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती नंदकुमार बेंडसे यांनी दिली. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांच्या अंतर्गत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित केली जाणार आहे.
16.15 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
या परीक्षेसाठी एकूण 16,15,489 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये
- 8,65,740 मुले,
- 7,49,736 मुली,
- 13 ट्रान्सजेंडर विद्यार्थी
यांचा समावेश आहे. राज्यातील 23,683 शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
पारदर्शक आणि कॉपीमुक्त परीक्षा
दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक आणि शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा दक्षता समिती अध्यक्षांना आवश्यक ते नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत सार्वजनिक परीक्षा निकोप वातावरणात घेण्यासाठी राज्य मंडळाने सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना अर्धशासकीय पत्राद्वारे आवाहन केले आहे. परीक्षा केंद्रांभोवती ४०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाहतूक आणि वीजपुरवठ्याची विशेष व्यवस्था
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) यांना गाड्या नियमित व वेळेत सोडण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षा काळात अखंडित वीजपुरवठा राहावा यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांनाही कळविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान अर्धा तास आधी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवेशपत्र दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार आवश्यक सवलती देण्यात येणार आहेत. यंदा प्रत्येक पेपरसाठी १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे.
मानसिक आधारासाठी हेल्पलाईन परीक्षा कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळाने हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करत १० समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ९९६०६४४४११, ७९७२५७३७४२, ९८३४०८४५९३, ९३५९९७८३१५, ८१६९२०२२१४, ९३७१६६१२५५, ७२०८४२९३८१, ७७०९१५६०६८, ९४०४७८३९९६ या क्रमांकावर समुपदेशनासाठी संपर्क साधण्याचे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.

