(रायगड)
अलिबाग तालुक्यातील कोर्लई किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळल्याच्या वृत्ताने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र प्रत्यक्षात घटनास्थळी कोणतीही बोट सापडली नसल्याने सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला. यानंतर भारतीय नौदलाच्या रडारवर मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम राबवली.
प्राथमिक तपासात संबंधित बोट खोल समुद्रात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. रायगड पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने प्रतिसाद देत शोधकार्य सुरू केले. यासाठी हेलिकॉप्टरचाही उपयोग करण्यात आला. तपासादरम्यान ‘मुकद्दर बोया ९९’ नावाची पाकिस्तानी मासेमारी बोट भारतीय नौदलाच्या रडारवर आल्याचे निष्पन्न झाले. ही बोट वादळामुळे पाकिस्तानमधील कराचीहून भारतीय जलसीमेत वाहून आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.

या संदर्भात रायगड पोलिसांनी 19 ठिकाणी सशस्त्र नाकाबंदी, सागरी किनाऱ्यावरील हॉटेल्स, रिसॉर्ट्स, लॉजेस आणि होम स्टे यांची तपासणी, तसेच जलद प्रतिसाद पथक व BDS तुकड्या कोर्लई, रेवदंडा, साळाव परिसरात गस्तीसाठी पाठवण्यात आल्या. स्थानिक मच्छीमार, सागररक्षक दल, भारतीय नौदल व तटरक्षक दल यांच्यासह संयुक्त शोधमोहीम राबवून समुद्रात बोट व संशयीत वस्तू शोधल्या गेल्या. यामध्ये ड्रोन तपासणी, GPS फ्लोटर यंत्रणा तपासण्यात आली.
मात्र रेवदंडा परिसरात आढळलेली वस्तू ही पूर्ण बोट नसून केवळ तिचा एक छोटा भाग, म्हणजे ‘बोया’ (सागरात दिशादर्शक तरंगणारी संरचना) असल्याचे स्पष्ट झाले. या बोयामध्ये बसवण्यात आलेल्या GPS ट्रॅकरच्या सहाय्याने बोटीची ओळख पटवण्यात आली. तपासात ही बोट पाकिस्तानच्या कराचीत सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.
सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही धोका नसल्याचे नौदल व पोलिसांनी स्पष्ट केले असून, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाने आवर्जून सांगितले आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून रायगड पोलीस दलाने ५२ अधिकारी आणि ६०० पोलीस यांच्या मदतीने संपूर्ण जिल्ह्यात शोध मोहीम राबवली. संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून प्रशासन सतर्क आहे.

