(नांदेड)
अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभर नियमभंग करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. त्यांच्या कठोर आणि तत्पर कार्यपद्धतीचा प्रत्यय आता नांदेडमध्येही आला असून, एका तक्रारीच्या आधारे डॉक्टर लेन परिसरातील नामांकित मेडिकल स्टोअरवर FDAने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे.
नायगाव तालुक्यातील हनुमंत वनाळेकर यांनी आपल्या ९० वर्षीय वडिलांसाठी डायबिटीसच्या औषधांच्या तीन स्ट्रिप्स शनिवारी नांदेड शहरातील डॉक्टर लेन येथील तोष्णीवाल मेडिकलमधून खरेदी केल्या होत्या. मात्र घरी गेल्यानंतर औषधांची तपासणी करताना त्यांच्या मुलीच्या निदर्शनास आलं की संबंधित गोळ्यांची मुदत डिसेंबर २०२५ मध्येच संपलेली होती. वृद्ध रुग्णाला मुदतबाह्य औषधे देण्यात आल्याचं समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला.
तक्रार थेट तुकाराम मुंढेंकडे
या गंभीर प्रकाराची दखल घेत हनुमंत वनाळेकर यांच्या मुलाने थेट अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना ई-मेलद्वारे तक्रार पाठवली. तक्रार मिळताच मुंढे यांनी तत्काळ नांदेड FDA अधिकाऱ्यांना चौकशी आणि कारवाईचे आदेश दिले. आयुक्तांच्या निर्देशानुसार सोमवारी नियोजनबद्ध सापळा रचण्यात आला. तक्रारदार पुन्हा संबंधित मेडिकलमध्ये जाऊन डायबिटीसच्या गोळ्या खरेदी करत असताना FDAचे सहायक आयुक्त अशोक राठोड आणि त्यांच्या पथकाने मेडिकलवर धाड टाकली.
दोन तास तपास, मुदतबाह्य औषधांचा साठा जप्त
तपासादरम्यान मेडिकलमध्ये मुदतबाह्य औषधांची विक्री होत असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर FDA अधिकाऱ्यांनी जवळपास दोन तास मेडिकलची सखोल तपासणी केली. संबंधित मुदतबाह्य औषधांचा साठा जप्त करण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत मेडिकल बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नांदेड शहरातील मोठ्या होलसेल मेडिकल स्टोअर्सपैकी एक म्हणून ओळख असलेल्या तोष्णीवाल मेडिकलवर झालेल्या या कारवाईमुळे औषध विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
प्राथमिक तपासणीतच त्रुटी आढळल्याने अधिकाऱ्यांनी तात्काळ ‘तोष्णीवाल मेडिकल’ला सील ठोकले. अन्न व औषध प्रशासनाकडून या दुकाची सखोल तपासणी सुरू असून, प्राथमिक तपासणीत दुकानात कालबाह्य झालेल्या इतरही अनेक गोळ्या व औषधे देण्यात आल्या आहेत याबाबत तपास सुरु आहे. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणी कठोर भूमिका घेतली असून, तोष्णीवाल मेडिकलवर ‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 आणि नियम 1945’ अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, “नजरचुकीने या गोळ्या दिल्या गेल्या” असा बचाव तोष्णीवाल मेडिकलच्या वतीने करण्यात आला आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना इशारा
या कारवाईतून FDA प्रशासनाने ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे. दरम्यान, नांदेड शहरातील इतर मेडिकल स्टोअर्सचीही तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुदतबाह्य औषधांची विक्री हा गंभीर गुन्हा मानला जात असून नागरिकांनी औषधे खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

