(रत्नागिरी /प्रतिनिधी)
औद्योगिक सुरक्षेच्या मोठमोठ्या दाव्यांमागील वास्तव पुन्हा एकदा उघडे पडले आहे. जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर काम करणाऱ्या बिहारमधील एका ३७ वर्षीय कामगाराचा तब्बल ४५ मीटर उंचीवरून खाली कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातामुळे पोर्टवरील सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र निर्माण झाले असून, कामगारांच्या जीवाशी सुरू असलेल्या खेळाबाबत संताप व्यक्त होत आहे.
राजुकुमार बालेश्वर सिंह (रा. सिवान, बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी कामाची वेळ संपल्यानंतर तो इतर सहकाऱ्यांसह कोल शेडवरील काम आटोपून खाली उतरत होता. यावेळी सेफ्टी हुक बदलताना तोल गेल्याने त्याचा पाय फायबरच्या पत्र्यावर पडला. वजनाचा ताण सहन न झाल्याने पत्रा तुटला आणि राजुकुमार थेट ४५ मीटर उंचीवरून खाली कोसळला. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर जखमी कामगाराला ततडीने उपचारासाठी नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी या प्रकरणातील अनेक बाबी संशय आणि संताप निर्माण करणाऱ्या आहेत.
४५ मीटर उंचीवर काम करणाऱ्या कामगारासाठी डबल लॅन्यार्ड हार्नेसचा वापर बंधनकारक मानला जातो. मग तो वापरण्यात आला होता का? एका हुकवरून दुसऱ्यावर जाताना कामगार पूर्णपणे असुरक्षित कसा राहिला? खाली सेफ्टी नेट का नव्हती? लाईफ लाईनची व्यवस्था होती का? घटनास्थळी सुरक्षा पर्यवेक्षक उपस्थित होता का? अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत.
औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा ही केवळ सूचना फलकांपुरती मर्यादित नसून ती प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिसणे अपेक्षित असते. मात्र या दुर्घटनेने व्यवस्थापनाच्या सुरक्षा दाव्यांची पोलखोल झाल्याची चर्चा कामगारांमध्ये सुरू आहे. राजुकुमारचा मृत्यू हा केवळ अपघात होता की व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम, याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे. कामगार संघटनांनी आणि स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी प्रथमदर्शनी सुरक्षेतील त्रुटी आणि हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसत असल्याने कंपनी प्रशासनाविरुद्ध निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. एका निष्पाप कामगाराचा जीव गेल्यानंतरही जर जबाबदारी निश्चित झाली नाही, तर औद्योगिक सुरक्षेचे नियम केवळ कागदोपत्री असल्याची भावना अधिक बळावणार आहे.

