(विशेष /प्रतिनिधी)
जिल्हा रुग्णालयात सध्या वैद्यकीय सेवांचा भार प्रचंड वाढला असतानाही येथील डॉक्टर रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत अहोरात्र कार्यरत असल्याचे प्रेरणादायी चित्र समोर आले आहे. रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ. सांगवीकर यांनी अर्धरात्रीपासून सकाळपर्यंत सलग सिझेरियन शस्त्रक्रिया करून रुग्णसेवेचा आदर्श घालून दिला. त्याचवेळी शल्यचिकित्सक डॉ. मनोहर कदम यांनी ७५ वर्षीय महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करत रात्र जागवली. दोन्ही डॉक्टरांचे हे अहोरात्र कार्य जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सेवेची ताकद दाखवणारे ठरत आहे.
संगमेश्वर येथील ७५ वर्षीय वयोवृध्द महिला हर्नियाच्या त्रासाने त्रस्त झाली होती. या वयोवृद्ध महिलेला स्ट्रँगलेटेड वेंट्रल हर्णिया असल्याने हा आजार अत्यंत गंभीर व जीवघेणा आजार मानला जातो. या अवस्थेत पोटाच्या भिंतीतील हर्नियामध्ये अडकलेल्या आतड्यांचा रक्तपुरवठा अचानक बंद होतो. परिणामी संबंधित अवयव निकामी होण्याचा, सेप्सिसचा तसेच रुग्णाच्या जीविताला थेट धोका निर्माण होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत विलंब न करता तातडीची शस्त्रक्रिया करणे हाच एकमेव प्रभावी उपचार ठरतो. या ७५ वर्षीय वयोवृद्ध महिलेला नातेवाईकांनी सुरुवातीला काही दिवस डेरवण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले होते.
चार पाच दिवस उलटण्यानंतर नातेवाईकांनी रत्नागिरी शासकीय जिल्हा रुग्णालय हलविण्याचा निर्णय घेतला. दिनांक 7 जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता वयोवृद्ध महिलेला नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांत सर्व आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार डॉ. मनोहर कदम यांनी एक वाजता शस्त्रक्रिया सुरू केली. ही अत्यंत जोखमीची व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सकाळी पाच वाजेपर्यंत सलग सुरू होती.
विशेष म्हणजे, याच कालावधीत प्रसूतीदरम्यान गर्भातील बाळाकडून मेकोनियम स्त्राव झाल्याचे निदर्शनास आल्याने आई व बाळाच्या जीविताला तातडीचा धोका निर्माण झाला होता. ही अवस्था अत्यंत गंभीर असल्याचे ओळखून स्त्रीरोग तज्ञ डॉ. सांगवीकर यांनी कोणताही विलंब न करता तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. मध्यरात्री उद्भवलेल्या या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत आवश्यक तपासण्या पूर्ण करून तातडीचे सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे संभाव्य गुंतागुंत टळली असून आई व नवजात शिशू दोघेही सध्या सुखरूप आहेत. ही अत्यंत गंभीर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतरही स्त्रीरोग तज्ञ डॉ. सांगवीकर यांनी कोणतीही विश्रांती न घेता पुढील सिझेरियन शस्त्रक्रियेला सुरुवात केली. रात्रभर चाललेल्या सलग शस्त्रक्रियांनंतर त्यांनी सकाळ उजाडताच दुसऱ्या दिवशी नियमित दिनक्रमात रुग्णसेवेसाठी हे डॉक्टर पुन्हा कार्यरत झाले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा हा समर्पणभाव सर्वसामान्य रुग्णांसाठी आश्वासक ठरत आहे. तसेच अपुऱ्या मनुष्यबळातही जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर उच्चजोखमीच्या प्रसूती यशस्वीपणे हाताळत असल्याने, येथील वैद्यकीय सेवेची तत्परता व कौशल्य अधोरेखित होत आहे.
या संपूर्ण वैद्यकीय प्रक्रियेत भूलतज्ञ डॉ. जमशेर बाबू यांचे योगदानही अत्यंत मोलाचे ठरत आहे. दीर्घकाळ चाललेल्या शस्त्रक्रियांदरम्यान भूल व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. अपुऱ्या मनुष्यबळातही रुग्णसेवेचा वसा जपत, रात्रंदिवस झटणारे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर हे खऱ्या अर्थाने आरोग्य सेवेचे आधारस्तंभ असल्याचे बोलले जात आहे. अशा समर्पित वैद्यकीय सेवेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, अशी देखील भावना रुग्ण, नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे.

