( मुंबई )
यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान कोकण रेल्वेने खासगी वाहनांसाठी चालवली जाणारी रोल ऑन रोल ऑफ (रो-रो) सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी या सेवेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या सेवेसाठी अत्यल्प म्हणजेच 20 हून कमी वाहनांचीच बुकिंग झाली होती. त्यामुळे प्रवाशांकडून कमी मागणी लक्षात घेऊन सध्या ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. मागणी वाढल्यास भविष्यात सेवा पुन्हा सुरू करण्याचा विचार केला जाऊ शकतो.
कोकण रेल्वेची खासगी वाहनांसाठीची रो-रो सेवा 23 ऑगस्ट 2025 रोजी सुरू करण्यात आली होती. या सुविधेमुळे प्रवासी आपली खासगी वाहने रेल्वेने कोकणात पाठवू शकत होते, तर स्वतः वेगळ्या मार्गाने प्रवास करू शकत होते. मात्र ही सुविधा अपेक्षेप्रमाणे लोकप्रिय ठरली नाही.
दरम्यान, यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने विशेष ट्रेन सेवांवर भर दिला आहे. मागील वर्षी 382 गणपती विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या, तर यंदा ही संख्या वाढवून सुमारे 400 विशेष ट्रेन चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अतिरिक्त गाड्यांमुळे मुंबई–कोकण मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. वेटिंग लिस्ट कमी होण्यास मदत होणार असून गणेशोत्सव काळातील गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

