(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या नव्या वास्तूचे बांधकाम जलद गतीने सुरू असून, या ऐतिहासिक वाचनालयाच्या नव्याने उभारल्या जाणाऱ्या इमारतीसाठी सुमारे ३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे वाचनालय येत्या १४ जानेवारी २०२७ रोजी आपला द्विशताब्दी सोहळा साजरा करणार आहे. १९७ वर्षांचा गौरवशाली वारसा लाभलेल्या या संस्थेच्या नव्या इमारतीच्या उभारणीसाठी “ग्रंथप्रासाद निर्माण निधी” या नावाने निधी संकलन मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमामध्ये सर्व वाचक, नागरिक, ग्रंथप्रेमी आणि संस्कृतीप्रेमींनी आपल्या यथाशक्तीने आर्थिक योगदान द्यावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे. या निधीसाठी देण्यात येणाऱ्या देणग्यांना आयकर कायद्यांतर्गत सवलत उपलब्ध असून, देणगीदारांना त्याचा लाभ घेता येईल.
वाचनालयाचा ग्रंथदेवघेव विभाग येत्या दीपावलीपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न असून, नागरिकांनी या सुसंस्कृत चळवळीला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
देणगी जमा करण्यासाठी तपशील:
नाव: Ratnagiri Jilha Nagar Vachanalay
बँक: Ratnagiri District Central Co-op. Bank Ltd., Ratnagiri Branch
खात्याचा प्रकार: बचत खाते (Savings Account)
खाते क्रमांक: 1611006022828
IFSC कोड: IBKL0574RDC
नवीन वाचनालय उभे राहावे, ग्रंथसंस्कृती नांदावी, वाचनसंस्कार वृद्धिंगत व्हावेत या हेतूने “वाचनालयासाठी एक पाऊल पुढे” हा विचार घेऊन सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन वाचनालय व्यवस्थापन समितीने केले आहे.