(गणपतीपुळे / वैभव पवार)
जोपर्यंत मुलांच्या डोक्यावर वडीलांचे छत्र असते तोपर्यंत त्यांना जगाची आणि स्वत: ची काळजी करायची गरज नसते. परंतु ज्यावेळी हे छत्र दूर होते, तेव्हा कोणतीही किंमत मोजून ते परत आणता येत नाही. आई वडिलांची वेळीच महती ओळखा, त्यांचा नेहमी आदर करा. मुलांनी आपल्या आई वडिलांची मान शरमेने झुकेल असे वर्तन करु नये, असे मत प्रख्यात वक्ते वसंत हंकारे यांनी व्यक्त केले. ते खंडाळा येथील सर्वसाक्षी सभागृहात आयोजित केलेल्या व्याख्यान प्रसंगी बोलत होते.
या व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे आणि भाजपा जि. प. गट वाटद यांनी केले होते. या व्याख्यानप्रसंगी बोलताना श्री. हंकारे पुढे म्हणाले, मुलांनी मोबाईलचा अतिरेक टाळावा, अनोळखी व्यक्तीशी मोबाईलवरून ओळख करुन, प्रेमाच्या फसव्या जगात ओढले जाते, व तेथे मुलींची फसगत होते. अन्याय अत्याचारापासुन दूर रहायचे असेल तर आपल्या संस्कार व शिक्षणाची कास धरा. परिपुर्ण शिक्षण घेवून तुम्ही जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभे रहात नाही, तोपर्यंत प्रेमाच्या माया जालापासुन दूर रहा, सजग रहा असे आवाहन त्यांनी केले.
श्री हंकारे यांनी उपस्थित प्रत्येक विद्यार्थी व पालकांच्या डोळ्यात अश्रू उभे केले. या व्याख्यानाला खंडाळा व परिसरातून विद्यार्थी व पालक यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी विवेक सुर्वे यांनी श्री. हंकारे यांचा वाटद जि.प. गट भाजपा यांचेवतीने यथोचित सत्कार केला.
याप्रसंगी उपस्थित असलेले मुख्याध्यापक प्रदीप वाघोदे, विलासराव कोळेकर, आनंदा पाटील व अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या व्याख्यान कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी विवेक सुर्वे यांचेसह संकेत ढवळे, निखिल बोरकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

