(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा संस्कार विभाग आणि तालुका शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान बुद्धांनी सुरू केलेल्या वर्षांवास धम्म प्रवचन मालिकेचा शुभारंभ आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने बुधवारी (२९ जुलै) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाला. समाजात धम्म, प्रज्ञा आणि करुणेची मूल्ये अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय जाधव होते. प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनंत सावंत आणि तालुकाध्यक्ष सुनील पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण, दीपप्रज्वलन आणि सामुदायिक सूत्रपठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्घाटक म्हणून बोलताना जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांनी वर्षांवास धम्म प्रवचन मालिकेचे उद्घाटन जाहीर करत उपस्थितांना धम्माच्या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. तालुकाध्यक्ष सुनील पवार यांनी उपस्थित मान्यवर तसेच पाली भाषा अभ्यासक्रमात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. यावेळी प्रदीप जाधव, सुभाष जाधव, आर. बी. कांबळे, विद्याधर कदम, अरुणकुमार मोरे, अनिल घाडगे, प्रकाश सुर्वे, सुदर्शन सकपाळ, विजय कांबळे, सुरेश कांबळे आणि सिद्धार्थ जाधव यांनी शुभेच्छा व्यक्त करून उपक्रमास यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमातील प्रमुख प्रवचनात एन. बी. कदम गुरुजी यांनी ‘विश्वगुरू तथागत भगवान बुद्ध’ या विषयावर सखोल विवेचन केले. भगवान बुद्धांचे विचार आजच्या जागतिक मानवतेसाठीही तितकेच मार्गदर्शक असून समता, करुणा आणि विवेकाच्या तत्त्वांवर आधारित जीवनमूल्यांची आवश्यकता अधोरेखित केली. अध्यक्षीय समारोपात विजय जाधव यांनी आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक तालुका व गावपातळीवर वर्षांवास धम्म प्रवचन मालिका प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. धम्माचा व्यापक प्रचार-प्रसार करून आदर्श, सुसंस्कृत आणि समताधिष्ठित समाज घडविणे हेच संस्थेचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास जिल्हा, तालुका व गाव शाखांतील पदाधिकारी, बौद्धाचार्य, माजी श्रामणेर, केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, सैनिक तसेच उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्पेश सकपाळ (सचिव, संस्कार विभाग) आणि प्रितम सावंत (उपाध्यक्ष, संस्कार विभाग) यांनी केले. अखेरीस शरणत्तेयने कार्यक्रमाची सांगता झाली.

