(सोलापूर)
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन अखेर तीन दिवसांनंतर मागे घेतले. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी रात्री भेट घेत चर्चा केल्यानंतर रोहित पवार यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री यांनी चर्चेसाठी बोलावले असून २२ जूनपूर्वी मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून कर्जमाफी योजनेंतील अटींबाबत समितीमार्फत चर्चा केली जाणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, ४ जुलै रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यव्यापी मोठे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा देखील रोहित पवार यांनी केली. “या आंदोलनामध्ये कोणतेही राजकारण नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये हीच आमची भूमिका आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कर्जमाफी योजनेतील अटी हटवण्याची मागणी
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याबद्दल रोहित पवार यांनी सरकारचे अभिनंदन केले. “अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म माझ्या मतदारसंघात झाला आहे. सरकारने काढलेला जीआर महत्त्वाचा आहे, मात्र त्यामध्ये अनेक अटी असल्याने मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहतील,” अशी टीका त्यांनी केली.
२०१९ मध्ये महात्मा फुले यांच्या नावाने झालेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नव्या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान वाढवण्याची मागणी
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून जाहीर करण्यात आलेली ५० हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम अपुरी असल्याचे सांगत ही मर्यादा वाढवावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. “योजनेतील अटींमुळे अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे या अटी हटवण्यात याव्यात,” असेही त्यांनी नमूद केले.
चर्चेसाठी शेतकरी नेत्यांची उपस्थिती
सरकारसोबत होणाऱ्या चर्चेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेतकरी नेते रविकांत तुपकर, किसान सभेचे डॉ. अजित नवले, शेकापचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार असल्याची माहितीही रोहित पवार यांनी दिली.

