( मिरज )
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे (ता. मिरज) येथे मंगळवारी रात्री दोन मोटारींच्या समोरासमोरील भीषण धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अनिकेत निवृत्ती एकल (२४) आणि राजेश गोकुळराव जाधव (२६, दोघेही रा. बजरंगनगर, कुपवाड) अशी मृतांची नावे असून, या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत आणि राजेश हे कारने कुपवाडच्या दिशेने जात असताना त्यांची गाडी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारला जबर धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की दोघे जागीच ठार झाले. एका तरुणाचा मृतदेह गाडीच्या आतच अडकून राहिल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य करणाऱ्या पथकाला मोठा वेळ लागला.
अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस आणि महादेव अॅम्बुलन्स सेवेचे महादेव वनखंडे व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात रात्रीच्या सुमारास झाल्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवले.
दरम्यान, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच असून, महामार्ग पोलिसांनी वाहनचालकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.