(संगमेश्वर / प्रतिनिधी)
भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक विस्ताराला अधिक बळ देण्यासाठी प्रा. राजेंद्र प्रभाकर बोथरे (रा. कडवई, ता. संगमेश्वर) यांची भाजप ओबीसी सेल, संगमेश्वर उत्तर तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर झालेली ही नियुक्ती भाजप ओबीसी मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सहदेव (देवजी) बेटकर यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली.
प्रा. बोथरे यांनी यापूर्वी विविध सामाजिक, प्रशासकीय आणि लोकहिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, मानवाधिकार संघटनेतील पदाधिकारी तसेच विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer – SEO) म्हणून जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या समाजाभिमुख कार्याची, नेतृत्वगुणांची आणि जनसंपर्काची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपविली आहे.
नियुक्तीनंतर प्रा. बोथरे यांनी पक्षाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, समाजहित, संघटन बळकटी आणि राष्ट्रहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
नियुक्तीपत्र प्रदान समारंभास संगमेश्वर उत्तर तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, दक्षिण मंडळ अध्यक्ष रुपेश कदम, तालुका सरचिटणीस डॉ. अमित ताटरे, अविनाश गुरव, चंद्रकांत जाधव, देवरुख शहराध्यक्ष दत्ताजी नार्वेकर यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाजप समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रा. राजेंद्र प्रभाकर बोथरे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नियुक्तीमुळे संगमेश्वर तालुक्यातील भाजप ओबीसी सेलच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा आणि अधिक बळ मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडूनही त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात आले आहे.

