(मुंबई)
मुंबईत राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. एकीकडे विधान परिषद निवडणुकींची प्रक्रिया सुरू असताना, दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन टायगर’ या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या सर्व घडामोडींमध्ये रविवारी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातील लोकसभा खासदारांची महत्त्वाची बैठक ‘मातोश्री’ निवासस्थानी घेतली. या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर काही खासदारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला.
बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहिलेल्या खासदारांमध्ये अरविंद सावंत (मुंबई दक्षिण), अनिल देसाई (मुंबई दक्षिण मध्य), राजाभाऊ वाझे (नाशिक) आणि संजय दिना पाटील (मुंबई उत्तर-पूर्व) यांचा समावेश होता. तर ऑनलाईन सहभागी झालेल्या खासदारांमध्ये संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), संजय जाधव (परभणी), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) आणि ओमराजे निंबाळकर (धाराशिव) यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. “ही बैठक कोणत्याही ‘ऑपरेशन टायगर’नंतरची नाही, तर नियमित नियोजित बैठक आहे. आम्हाला अशा चर्चांची भीती नाही. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. विरोधकांच्या ‘ऑपरेशन टायगर’ला आम्ही ‘ऑपरेशन लांडगा’ने उत्तर देऊ,” असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, खासदार संजय दिना पाटील यांनीही स्पष्ट केले की, ते शिवसेना (UBT) सोबतच आहेत आणि त्यांना कोणतीही ऑफर आलेली नाही. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी वैयक्तिक संबंध असल्याचे सांगत, “कामानिमित्त भेटी होतात, पण त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नये,” असे स्पष्ट केले.
राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले असले तरी शिवसेना (UBT) गटाने एकजूट दाखवण्याचा प्रयत्न या बैठकीतून केल्याचे दिसून येत आहे.

