(पंढरपूर /सोलापूर)
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पंढरपूर–म्हसवड मार्गावर रविवारी भीषण अपघात घडला. तांदुळवाडी परिसरात रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत पिकअप वाहन कोसळून आठ भाविकांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील भाविक देवदर्शनासाठी म्हसवड येथे गेले होते. दर्शन आटोपून परत येत असताना हा अपघात घडला. पिकअपमध्ये एकूण 16 जण प्रवास करत होते. यामध्ये लहान मुलांचा समावेश असल्याने दुर्घटना अधिकच गंभीर ठरली. अपघातात सहा महिन्यांची बालिका आणि आठ वर्षांच्या मुलासह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व जखमींना तातडीने पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींवर उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:
इंदुबाई दशरथ भाऊ (60), पूजा अमोल सातोरे (23), समर्थ बालाजी बावचे (27), अश्विनी संदीप बावचे (27), संस्कार संदीप बावचे (14), संस्कृती संदीप बावचे (14), पूजा बालाजी बावचे (6 महिने), आरव अशोक सातोरे (8)

स्थानिकांच्या माहितीनुसार, रस्त्यालगत असलेल्या विहिरीला संरक्षण कठडे नसल्याने वाहन थेट विहिरीत कोसळले. या घटनेनंतर प्रशासनाच्या सुरक्षितता उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

इरफान मुजावरचा धाडसी बचाव; विहिरीत उडी मारून 3 जणांचे प्राण वाचवले
पंढरपूर–म्हसवड मार्गावरील भीषण अपघातात इरफान मुजावर यांच्या प्रसंगावधानामुळे तीन जणांचे प्राण वाचल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी दुपारी ज्या पीकअप वाहनातून हे कुटुंब पंढरपूरच्या दिशेनं जात होतं. या गाडीच्या मागे इरफान मुजावर आणि त्याचा रणदिवे नावाचा एक मित्र दुचाकीवरून जात होते. ज्यावेळी हा अपघात घडला, तेव्हा दोघांची दुचाकी या गाडीच्या मागे होती. अपघात घडताच दोघंही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दोघांनी अपघातग्रस्त वाहनातील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी इरफानने थेट विहिरीत उडी घेतली आणि एका चार वर्षांच्या मुलासह दोन वाचवलं, याबाबतची माहिती प्रत्यक्षदर्शी इरफानने स्वत: सांगितली.
घटना घडताच इरफानने तातडीने वडिलांना फोन करून गावातील लोकांना घटनास्थळी बोलावले आणि एका व्यक्तीच्या मदतीने स्वतः विहिरीत उडी घेतली. इरफान मुजावर यांनी धाडस दाखवत विहिरीत अडकलेल्या तीन जणांना बाहेर काढण्यात यश मिळवले. त्यांच्या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे हे जीव वाचवणे शक्य झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप उलट दिशेने विहिरीत कोसळल्याने काही प्रवासी विहिरीवर असलेल्या कापड किंवा संरचनेत अडकले होते. त्यामुळे मदतकार्य अधिक कठीण झाले होते. यानंतर तांदुळवाडी गावातील ग्रामस्थही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अनेकांनी नंतर विहिरीत उतरून बचावकार्य सुरू केले. स्थानिकांच्या या सामूहिक प्रयत्नांमुळे एकूण आठ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. या घटनेनंतर परिसरात ग्रामस्थांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घटनेवर प्रतिक्रिया देताना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, विहिरीला संरक्षक कठडे होते की नाही याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. त्यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यांनी जखमींवर तातडीने उपचार सुरू असल्याचे सांगत प्रशासनाला बचावकार्य आणि मदतीसाठी निर्देश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून प्रशासनाने तातडीने मदतकार्य आणि चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

