( बीड )
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनातील वाढीव मोबदल्याच्या बहुचर्चित घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना मोठा झटका बसला आहे. 241 कोटी 62 लाख रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात बीड पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता जिल्हा न्यायालय क्रमांक 2 चे न्यायाधीश एस. आर. शिंदे यांनी 15 मेपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून महसूल प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या या प्रकरणाच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, भूसंपादनाच्या 154 प्रकरणांमध्ये वाढीव मोबदल्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाल्याचा आरोप आहे. यापैकी सुमारे 72 कोटी रुपयांचा वाढीव मोबदला नियमबाह्य पद्धतीने वितरित करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आदेशपत्रांवरील स्वाक्षऱ्यांच्या तपासानंतर अविनाश पाठक यांना लातूर येथून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि नंतर अटक करण्यात आली.
पोलिसांनी न्यायालयात काय सांगितले?
न्यायालयात सुनावणीदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून लॅपटॉप जप्त करणे, कॉल रेकॉर्डिंगसाठी आवाजाचे नमुने घेणे आणि लातूर, पुणे व मुंबई येथील घरांची झडती घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तपासात 154 पैकी 148 संचिका मिळाल्या असून सहा महत्त्वाच्या संचिका अद्याप बेपत्ता असल्याची माहितीही पोलिसांनी न्यायालयाला दिली.
बचाव पक्षाचा युक्तिवाद
आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध करत सर्व कागदपत्रे कार्यालयीन स्वरूपाची असल्याने कोठडीची आवश्यकता नसल्याचा दावा केला. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर उशिरा अटक करण्यात आल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. आरोपीच्या वतीने ॲड. के. पी. ठिगळे आणि मिलिंद वाघिरकर यांनी बाजू मांडली, तर सरकार पक्षातर्फे अजय सरवदे यांनी युक्तिवाद केला.
घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता
313 कोटी रुपयांच्या भूसंपादन मोबदला वाटप प्रकरणात संशयास्पद व्यवहार, नियमबाह्य मंजुरी आणि कागदपत्रांतील फेरफार समोर आल्याने या घोटाळ्याची व्याप्ती अधिक मोठी असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणात उच्चपदस्थ अधिकारी, दलाल आणि संबंधित यंत्रणांमधील संगनमत उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.

