(सुरत /गुजरात)
सुरत शहरातील अल्थान भागात बुधवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. यंत्रमाग कारखान्याचा मालक असलेल्या व्यक्तीच्या पत्नीने तिच्या २ वर्षांच्या मुलासह १३ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
आईने आधी बाळाला टाकलं, मग स्वतः उडी घेतली
३० वर्षीय पूजा पटेल हिने प्रथम तिच्या दोन वर्षांच्या मुलगा कृष्ण याला १३ व्या मजल्यावरून खाली फेकलं आणि केवळ १२ सेकंदांनंतर स्वतःही उडी मारली. ही धक्कादायक घटना मार्तंड हिल्स सोसायटीत घडली. घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून त्यात पूजा आणि मुलगा लिफ्टमधून वर जाताना दिसतात. त्याआधी ती सोसायटीतील एका महिला शिंपीकडे ब्लाउज पीस घेऊन गेली होती, मात्र ती शिंपी महिला घरात नसल्याने तिथून पूजा घरी न जाता थेट १३ व्या मजल्यावर गेली. दरम्यान, काहीतरी पडण्याचा मोठा आवाज ऐकून सोसायटीतील एक व्यक्ती धावत बाहेर आली. त्याने खाली दोघांचेही मृतदेह पडलेले पाहिले. 108 रुग्णवाहिकेला तत्काळ बोलवण्यात आलं, मात्र आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला होता.
कोणतंही कारण स्पष्ट नाही; पोलिस तपास सुरू
विलेशकुमार पटेल, पूजाचे पती, हे यंत्रमाग कारखान्याचे मालक असून, कुटुंब सहाव्या मजल्यावर राहत होते. कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असून, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही कोणतीही समस्या असल्याचं समोर आलेलं नाही. त्यामुळे पूजाने हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत पोलीस तपासात गूढता कायम आहे. पोलीस निरीक्षकांनी पूजाचा मोबाईल फोन तपासणीसाठी जप्त केला आहे. आत्महत्येआधी कोणता मानसिक ताण होता का, याचा शोध घेतला जात आहे. गुरुवारी दोघांचेही मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमनंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
पूजाच्या आत्महत्येने सोसायटीतील रहिवासी आणि नातेवाईक यांना या घटनेने प्रचंड धक्का बसला आहे. एक सुखी वाटणाऱ्या कुटुंबात इतका मोठा दुर्दैवी निर्णय का घडला, हे अजूनही कुणालाही समजलेलं नाही.

