(पुणे)
कोंढवा परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला मोठा धक्का देणारी बाब समोर आली आहे. छाप्यादरम्यान एका ठिकाणी बंद कपाटाची तपासणी केली असता त्यात कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम सापडली. अचानक उघड झालेल्या या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेसह परिसरातही खळबळ उडाली आहे.
कोंढवा पोलिसांना संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठवून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. कारवाईदरम्यान अवैध दारूचा साठा आढळून आला. त्याचवेळी परिसरातील एका बंद कपाटात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लपवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.
सापडलेली रोख रक्कम नेमकी कोणाची आहे, ती अवैध दारू व्यवसायातून मिळालेली आहे का, तसेच या प्रकरणामागे कोणते दारू माफिया किंवा गुन्हेगारी नेटवर्क कार्यरत आहे का, याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतले असून रोख रक्कम जप्त केली असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमर कौर ऊर्फ मद्रीकौर दादासिंग जुनी, दिलदार सिंग दादासिंग जुनी आणि देवाश्री जुनी सिंग अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलिसांकडून काकडे वस्तीमधील गल्ली क्रमांक दोनमध्ये गुरुवारी (ता. २५) प्रतिबंधात्मक कारवाई राबविण्यात आली.
या कारवाईदरम्यान हातभट्टी दारूचे ८० फुगे, ३५ लिटर क्षमतेचे दोन कॅन आणि विविध ब्रँडच्या व्हिस्की, रम आणि बिअरच्या बाटल्या आणि पॅकेट्स आढळून आले. सुमारे दोन लाख रुपये किमतीचा दारूसाठा आणि एक लाख ४१ हजार रुपये रोख असा सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात आर्थिक व्यवहार, अवैध दारूविक्रीचे जाळे आणि संभाव्य इतर गुन्हेगारी संबंधांचा तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर आवश्यक त्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

