(कोल्हापूर)
आजरा शहरातील आजरा-महागाव मार्गावर वाणी गल्लीमध्ये सोमवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. जुन्या घराचे साहित्य काढण्याचे काम सुरू असताना भिंत अचानक रस्त्याच्या दिशेने कोसळली. या दुर्घटनेत महाविद्यालयीन प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार (42) आणि शाळकरी मुलगी वैष्णवी तुकाराम भोसले (13) यांचा जागीच मृत्यू झाला. तर वैष्णवीची आई ललिता तुकाराम भोसले (45) या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जेसीबी काम सुरू असताना घडली दुर्घटना
सकाळी सुमारे साडेदहा वाजता जेसीबीच्या सहाय्याने घराचे पाडकाम सुरू होते. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र गटारीच्या बाजूने मोकळी जागा दिसल्याने तिघी त्या मार्गाने जात असताना भिंत अचानक कोसळली आणि त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या. घटना घडल्यानंतर स्थानिक कार्यकर्ते गौरव देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत ढिगारा उपसून जखमींना बाहेर काढले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केली असता ज्योती कुंभार आणि वैष्णवी भोसले यांना मृत घोषित करण्यात आले.
या दुर्घटनेत ललिता भोसले गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी ठेकेदार अभिजित बाबूराव हुक्केरी, विनोद पांडुरंग मोहिते आणि जेसीबी चालक मिथुन चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. फिर्याद सुनील पांडुरंग कुंभार यांनी दिली असून पुढील तपास युवराज धोंडे करत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, पाडकामावेळी पुरेशी सुरक्षा उपाययोजना न केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेनंतर बांधकाम व पाडकाम कामांतील सुरक्षेच्या नियमांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

