(अंबरनाथ)
स्मार्टफोन आणि हेडफोनच्या अतिरेकामुळे अनेक ठिकाणी जीवघेण्या घटना घडू लागल्या आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना अंबरनाथमध्ये २० जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली, ज्यात दोन जिवांचे दुर्दैवी बळी गेले. मोबाईलवर बोलत आणि हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या महिलेला धडकेने मृत्यू आला, आणि तिला वाचवण्यासाठी धावलेला तरुणही त्याच रेल्वेखाली चिरडून मरण पावला.
काय घडलं नेमकं?
ही दुर्घटना अंबरनाथच्या मोरीवली गावाजवळ बी-केबिन रोड परिसरात घडली. मृत महिला वैशाली सुनील धोत्रे (वय ४५, रा. मोरीवली) आणि तरुण आतिष रमेश आंबेकर (वय २९, रा. महालक्ष्मी नगर) हे दोघेही आनंदनगर एमआयडीसीतील एका कंपनीत सहकारी म्हणून काम करत होते. कामावरून घरी परतताना, आतिष हे वैशाली यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी आले होते. त्या दोघांनी रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. वैशाली हेडफोन लावून मोबाईलवर बोलत होत्या, त्याचवेळी ट्रेन वेगात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर आतिष आणि आजूबाजूच्या लोकांनी त्यांना थांबवण्यासाठी आवाज दिला. पण हेडफोनमुळे आवाज न ऐकू आल्याने वैशाली पुढेच जात राहिल्या. त्यांना वाचवण्यासाठी आतिष धावले, पण क्षणार्धात रेल्वेने दोघांनाही धडक दिली. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
आतिष हा आपल्या वृद्ध आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या दोन बहिणींची लग्नं झाली असून संपूर्ण कुटुंब त्याच्यावर अवलंबून होतं. त्याच्या अकाली मृत्यूने घरात शोककळा पसरली आहे. तर वैशाली यांच्या पश्चात पती, एक २२ वर्षांचा मुलगा आणि एक मुलगी आहे. पती रिक्षाचालक असून, सध्या मुलीच्या लग्नाची तयारी घरात सुरू होती. अशा वेळी घडलेली ही दुर्घटना कुटुंबासाठी फार मोठा आघात ठरली आहे.