(बारामती)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला दहा दिवस पूर्ण होत असतानाच बारामतीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान त्यांनी पवार कुटुंबाला धीर देत, अजित पवार यांच्या पश्चात राज्यातील जनतेच्या अपेक्षा मोठ्या असून त्या पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं. याच वेळी भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबतही महत्त्वाचे संकेत दिले असून, ३० जूनपूर्वी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, ही भेट पूर्णतः सांत्वनपर होती आणि यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला असून, आपण दादांच्या अतिशय जवळ होतो, हे संपूर्ण कुटुंबाला माहीत असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत विचारण्यात आलं असता, भरणे यांनी सध्या तरी याबाबत संयम राखण्याचं आवाहन केलं. घटनेला अद्याप तेरा दिवसही पूर्ण झालेले नाहीत, पवार कुटुंबीय सध्या दुःखातून सावरत आहे. त्यामुळे तेरा दिवसांनंतर वरिष्ठ नेते एकत्र बसून सर्वांच्या भावना ऐकून घेतल्यानंतरच या विषयावर चर्चा होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत बोलताना भरणे म्हणाले की, सर्व आमदारांची मतं विचारात घेतली जातील. अजित पवार यांच्या पश्चात पक्ष, राज्य आणि देशाच्या जबाबदाऱ्या कोणाकडे असाव्यात, यावर तेरा दिवसांनंतर सविस्तर चर्चा होऊन योग्य निर्णय घेतला जाईल. अमोल मिटकरी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी ठाम भूमिका मांडत सांगितलं की, अजित पवार यांच जाणं सर्वांसाठी अत्यंत दुःखद आहे आणि ही घटना विमान अपघाताचीच होती. या घटनेला वेगळा रंग देऊ नये, अशी विनंती त्यांनी केली.
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या कर्जमाफीबाबत बोलताना दत्तात्रय भरणे यांनी मोठी माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. सध्या आवश्यक माहिती संकलनाचं काम सुरू असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सादर होणार आहे. त्यानंतर ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शब्द सरकार नक्की पाळेल, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

