( वैभव पवार / गणपतीपुळे )
प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे समुद्राने अचानक रौद्र रूप धारण केल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून समुद्राच्या पाण्याच्या रंगात लक्षणीय बदल झाला असून, किनाऱ्यावर धडकणाऱ्या प्रचंड उंच आणि वेगवान लाटांमुळे चौपाटीच्या भूभागाची मोठ्या प्रमाणावर धूप झाली आहे. यामुळे संपूर्ण किनारपट्टीचा चेहरामोहरा बदलल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
सध्या समुद्रात निर्माण झालेल्या उधाणामुळे किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांचा वेग आणि उंची दोन्हीही वाढली आहे. या सततच्या लाटांच्या माऱ्यामुळे चौपाटीवरील वाळू मोठ्या प्रमाणात वाहून जात असून किनाऱ्याचा काही भाग खचल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याची सुरक्षितता धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या बदललेल्या परिस्थितीमुळे स्थानिक प्रशासन आणि जीवरक्षकांनी किनारपट्टीवर विशेष सतर्कता वाढवली आहे. पर्यटकांची गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतत निरीक्षण ठेवले जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने पर्यटकांना अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. गेल्या महिन्यात याच समुद्रात लाटांच्या तडाख्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, सध्याची परिस्थिती अधिकच चिंताजनक मानली जात आहे. त्यामुळे समुद्रस्नान पूर्णपणे टाळावे, खोल पाण्यात उतरू नये आणि किनाऱ्यापासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यटक आणि भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. समुद्रात उतरण्यास सक्त मनाई असून जीवरक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
गणपतीपुळे देवस्थान, स्थानिक प्रशासन आणि जयगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

