आजच्या आधुनिक युगात विवाहसंस्थेत अनेक बदल दिसून येत असताना, हिमाचल प्रदेशातून आलेली एक घटना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सिरमौर जिल्ह्यातील शिलाई तालुक्यातील कुन्हट गावात एका मुलीने दोन सख्ख्या भावांशी विवाह करून ‘बहुपती प्रथा’ पुन्हा एकदा चर्चेत आणली आहे. हा विवाह ‘उजला पक्ष’ किंवा ‘जोडीदार प्रथा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रथेनुसार पार पडला. ही प्रथा हाटी समाजाची महत्त्वपूर्ण सांस्कृतिक ओळख आहे आणि आजही हिमाचल प्रदेशात कायदेशीर मान्यता प्राप्त असलेली आहे.
पारंपरिक प्रथेनुसार, कुन्हट गावातील सूनिता चौहान हिने प्रदीप नेगी आणि कपिल नेगी या दोन सख्ख्या भावांशी १२ जुलै ते १४ जुलै दरम्यान विवाह केला. हा तीन दिवस चाललेला सोहळा शिरमौर जिल्ह्यातील ट्रान्स-गिरी परिसरात पार पडला आणि त्याला शेकडो लोक उपस्थित होते. या विवाहसोहळ्याला संपूर्ण गावाने साक्षीदार होत नाचत-गाजत स्वागत केले. विशेष म्हणजे, दोन्ही वर उच्चशिक्षित असून, एक हिमाचल जलशक्ती विभागात अधिकारी आहे, तर दुसरा परदेशात कार्यरत आहे. या विवाहामुळे गावातच नव्हे, तर संपूर्ण समाजात या प्रथेबाबत पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे.
परंपरेचा उद्देश: संपत्तीचे विभाजन टाळणे व कुटुंब एकत्र ठेवणे
‘उजला पक्ष’ ही प्रथा प्रामुख्याने संपत्तीचे विभाजन टाळण्यासाठी आणि एकत्र कुटुंब पद्धती टिकवून ठेवण्यासाठी पाळली जाते. अशा विवाहांमुळे कुटुंब एकसंघ राहते आणि सामाजिक स्थैर्य राखले जाते, अशी या प्रथेची पार्श्वभूमी आहे. हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागात साधारणपणे शेती हाच उत्पन्नाचा एक मुख्य आधार आहे. कुटुंबांचे उत्पन्न याच जमिनीवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत, सर्व भावांचे एकाच महिलेशी लग्न करून जमीन आणि मालमत्तेचे विभाजन रोखण्याचा प्रयत्न केला जातो. संयुक्त कुटुंबांमध्ये एकता राखण्यासाठी ही प्रथा अवलंबली जाते.
या प्रथेनुसार, पत्नी परस्पर सहमतीने कुठल्याही वेळी आणि कितीही दिवसांसाठी दोन्ही भावांमध्ये बदलत राहते आणि नंतर, संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे मुलांचे पालन-पोषण करते. साधारणपणे सर्वात मोठ्या भावाला कायदेशार पिता म्हणून घोषित केले जाते. मात्र, सर्व भाऊ एकत्रितपणे पालन-पोषणाची जबाबदारी पार पाडतात.
वधू आणि वरांनी यावेळी सांगितले की, कोणताही दबाव न ठेवता त्यांनी हा निर्णय एकमताने घेतला आहे. ही आमची पारंपरिक प्रथा असून आम्हाला तिचा अभिमान आहे, असं प्रदीपनं सांगितलं. सूनिता हिनंही या प्रथेची माहिती आधीपासूनच असल्याचं स्पष्ट केलं आणि कोणताही दबाव न ठेवता निर्णय घेतल्याचं सांगितलं. “सख्ख्या भावांमधील नातं मी मानते, त्यामुळे हा निर्णय स्वेच्छेने घेतला,” असंही ती म्हणाली.
‘उजला पक्ष’ ही प्रथा केवळ सिरमौरमध्येच नव्हे, तर किन्नौर, लाहौल, स्पीतीसारख्या इतर डोंगराळ भागांतही आजही अस्तित्वात आहे. कालांतराने ही परंपरा लोप पावण्याच्या मार्गावर असतानाच, कुन्हट गावातील थिंडो कुटुंब आणि संबंधित युवतीने घेतलेले धाडसी पाऊल या प्रथेला नवसंजीवनी देणारे ठरले आहे.