(संगमेश्वर / एजाज पटेल)
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ आणि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य अभिमानाने मिरवणाऱ्या आणि “आम्ही प्रवाशांच्या सेवेला नवीन टकाटक गाड्या आणल्या आहेत,” असा गाजावाजा करणाऱ्या एसटी महामंडळाचा आणखी एक जीवघेणा आणि भोंगळ कारभार रविवारी रात्री संगमेश्वर आगारामध्ये चव्हाट्यावर आला आहे. देवरुख आगाराच्या एका लांब पल्ल्याच्या बसच्या बॅटरीचा संगमेश्वर आगारातच रात्री साडेआठच्या सुमारास प्रचंड मोठा, कानठळ्या बसवणारा आवाज झाला. या आवाजाने संपूर्ण आगार हादरून गेले आणि प्रवाशांमध्ये एकच धांदल उडाली . महामंडळाच्या या निकृष्ट दर्जाच्या देखभालीमुळे आणि संगमेश्वर स्थानकातील तांत्रिक व्यवस्थेच्या दिवाळखोरीमुळे प्रवाशांना फटका बसत आहे.
धावत्या प्रवासात घटना घडली असती तर… विचारच न केलेला बरा
रविवारी रात्री संगमेश्वर आगार परिसर प्रवाशांनी खचाखच भरलेला होता. देवरुख आगाराची एम.एच. १४ एल.एक्स. ७१४२ ही ‘देवडे ते बोरिवली’ जाणारी गाडी आगारात उभी होती. अचानक या गाडीतून प्रचंड मोठा आवाज झाला. आवाज इतका भयानक होता की, भयभीत झलेले प्रवाशी एसटी बस मधून भयभीत होऊन बाहेर पडू लागले. तर आजूबाजूचे लोक व आगारात बसलेले प्रवाशी आवाजाच्या दिशेने धावू लागले. या वेळी बसच्या बॅटरी कक्षातून प्रचंड धूर आणि रासायनिक पाणी बाहेर फेकले जात असल्याचे दिसून आले.
सुदैवाने हा प्रकार गाडी आगारात उभी असताना घडला. अन्यथा पुढचे तर्कवितर्क यावेळी उपस्थिताकडून लढवले जात होते. आणि तशी काही दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतली असती का? असा संतप्त आणि आक्रमक सवाल आता जनता विचारत आहे.
चालक-वाहकाचे प्रसंगवधान, अधिकारी एसी केबिनमध्ये मस्त
हा स्फोट झाला तेव्हा बसचे चालक आणि वाहक नियंत्रण कक्षात नोंद करण्यासाठी गेले होते. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जीवाची पर्वा न करता तात्काळ बॅटरीचा कक्ष उघडला आणि मुख्य सप्लाय कीट बाहेर काढला, ज्यामुळे पुढील भीषण संभाव्य घटना टळली. स्फोट इतका तीव्र होता की बॅटरीच्या भागाचे तुकडे झाले होते.
प्रवाशांच्या सेवेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून आणलेल्या या गाड्या बाहेरून एकदम नवीन आणि ‘टकाटक’ दिसतात. मग अशा नव्या कोऱ्या गाडीची बॅटरी फुटतेच कशी? महामंडळात निकृष्ट दर्जाचे सुटे भाग वापरून प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू आहे का? की ‘बहुजन सुखाय’ म्हणत प्रवाशांना मृत्यूच्या खाईत ढकलण्याचा हा डाव आहे? असा थेट आरोप प्रवाशांनी केला आहे.
महामार्गाची ‘हार्ट-लाईन’ पण तांत्रिकदृष्ट्या अपंग; मेकॅनिकची वानवा
संगमेश्वर हे भौगोलिकदृष्ट्या मुंबई-गोवा महामार्गावरील अगदी मध्यवर्ती आणि महत्त्वाचे ठिकाण आहे. कोकणात ये-जा करणाऱ्या रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा लांब पल्ल्यावर धावणाऱ्या शेकडो एसटी बसेस दररोज या स्थानकात थांबून पुढे मार्गस्थ होतात. शासनाने या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सुसज्ज आणि भव्य बस स्थानक इमारत तर उभारली आहे, मात्र गाड्यांची तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी येथे हक्काचा ‘एकही कायमस्वरूपी मेकॅनिक उपलब्ध ठेवलेला नाही. ही संगमेश्वरची सर्वात मोठी शोकांतिका आहे.
गाडी संगमेश्वरला बिघडते आणि मेकॅनिक देवरुखवरून येतो
सध्याची दळभद्री परिस्थिती अशी आहे की, संगमेश्वर स्थानकात किंवा महामार्गावर जवळपास एखाद्या गाडीत बिघाड झाला, तर चालक-वाहकाला देवरुख आगाराशी संपर्क साधावा लागतो. तिथे माहिती मिळाल्यानंतर देवरुखवरून मेकॅनिक आणि साहित्य संगमेश्वरला पाठवले जाते. साहित्याची व्यवस्था करून, अधिकाऱ्यांच्या परवानगीची सोपस्करता पूर्ण करून देवरुख ते संगमेश्वर हे अंतर पार करून मेकॅनिक पोहोचेपर्यंत किमान १ ते २ तास सहज जातो.
रात्रीच्या बॅटरी स्फोटानंतरही हाच प्रकार घडला. देवरुख आगाराला चालक-वाहकाने माहिती दिल्यानंतर तिथून दुसरी बॅटरी आणि मेकॅनिक येईपर्यंत तास ते दीड तास प्रवाशांना रात्रीच्या वेळी ताटकळत राहावे लागले. रात्रीच्या वेळी लहान मुले, वृद्ध आणि महिला प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. बिघाड एका गाडीत होतो, पण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मनस्ताप शेकडो प्रवाशांना सहन करावा लागतो.
वर्षानुवर्षांची मागणी प्रशासनाच्या कचऱ्याच्या डब्यात
संगमेश्वर हे मध्यवर्ती स्थानक असल्याने आगार आवारात २४ तास कायमस्वरूपी मेकॅनिक आणि आवश्यक तांत्रिक साहित्याची उपलब्धता असावी, अशी रास्त मागणी स्थानिक नागरिक, प्रवासी वर्ग आणि जनतेकडून गेली अनेक वर्षे सातत्याने केली जात आहे. परंतु, कुंभकर्णी झोपेत असलेल्या एसटी प्रशासनाकडून या मागणीकडे नेहमीच अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. सुसज्ज इमारत उभी करून प्रवाशांना आकर्षित करायचे, पण गाड्यांच्या देखभालीच्या आणि दुरुस्तीच्या नावाखाली त्यांना वाऱ्यावर सोडायचे, असा महामंडळाचा कारभार सध्या सुरू आहे.
एसटी महामंडळाने आतातरी या गंभीर समस्येकडे डोळे उघडून पाहावे आणि संगमेश्वर स्थानकात तातडीने कायमस्वरूपी मेकॅनिकची नियुक्ती करावी, अन्यथा प्रवाशांच्या या रोषाचा मोठा उद्रेक महामंडळाला सहन करावा लागेल, असा आक्रमक इशारा प्रवाशांसह स्थानिक जनतेने दिला आहे.

