(संगमेश्वर / एजाज पटेल)
ग्रामसेवक यांनी मुख्यालयी कार्यक्षेत्रात वास्तव्य करावे, असे शासनाचे थेट आदेश असताना संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका मुख्यालयी न राहता शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्याचे चित्र आहे. मात्र याचा विपरीत परिणाम गाव विकासाच्या कामावर बसत आहे. यामुळे योजना राबवणं, तक्रारींचं निवारण, त्वरित प्रतिसाद ही सर्व कामे विलंबाने होतात. परिणामी ग्रामस्थांची कामे वेळेवर होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून शासनाच्या आदेशाला धुडकावून गाव विकासाला खिळ बसण्यास कारण ठरणाऱ्या येथील ग्रामसेवकच्या कारभाराची चौकशी करण्याच्या संदर्भात लवकरच जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थ निवेदन देणार असल्याची माहिती आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जातात. या सर्व योजना गावातील सर्व घटकांपर्यंत सर्वकाळ उपलब्ध होतील, असे शासनाकडून कटाक्षाने पाहिले जाते. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत नियुक्त केलेल्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे शासनाने बंधनकारक केले आहे. असे असताना संगमेश्वर तालुक्यातील खाडीभागात येणाऱ्या पिरंदवणे ग्रामपंचायतसाठी गेले काही वर्ष कार्यरत असलेल्या ग्रामसेविका मुख्यालयी न राहता तालुक्याच्या शहरी भागात राहून तेथून ये-जा करत आहेत. त्यामुळे कार्यालयात उपस्थित राहण्याचे वेळापत्रक नेहमीचेच कोलमडलेले असते.
ग्रामसेवक हा गाव आणि सरपंच या मधील दुवा समजला जातो. गावचे मिनिमंत्रालय म्हणजेच ग्रामपंचायत होय. याच मिनिमंत्रालयामधून गाव विकास कामाचा आराखडा तयार करण्यापासून ग्रामस्थांना शासकीय कामकाजासाठी लागणारे तसेच शालेय विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्रे उपलब्ध करून देणे आदी कामे केली जातात. हे कार्य करण्यासाठी शासनाकडून प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवकांची नेमणूक करण्यात येते.
ग्रामसेवकांकडून जनतेची कामे वेळेवर व पारदर्शक पार पाडली जावीत म्हणून त्यांना मुख्यालय कार्यक्षेत्रात राहण्याचे आदेश असताना येथील कार्यरत ग्रामसेविका ह्या ग्रामपंचायत पासून सुमारे वीस ते पंचवीस की.मी अंतरावर असलेल्या तालुका शहरी भागातून ये-जा वाऱ्या करत असतात. परिणामी त्या अनेकदा ग्रामपंचायत कार्यालयात वेळेत पोहचत नसल्याने विकासकामांना खिळ बसत असल्याचा संतापजनक आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. अनेकदा ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारूनही ग्रामपंचायतीकडून आवश्यक असणारी कागदपत्रे सुद्धा मिळत नसल्याचे सांगितले जाते.
सुमारे पाच वर्षापासून अधिक काळ येथील ग्रामपंचायतचा कारभार याच ग्रामसेविकेकडे असून, हा प्रकार नवीन विषय नाही. त्या मुख्यालयी वास्तव्य करत नाहीत याबाबत या पूर्वीसुद्धा ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून सबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी केली होती. तशा स्वरूपाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. या वेळी सबंधित विभागाच्या वरिष्ठांनी याबाबत सुधारणा करण्याच्या सूचना देऊन यापुढे समाधानकारक सेवा पुरवण्यात येईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. मात्र त्यावेळी दिलेले आश्वासन हवेत विरले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण आज सुद्धा तसाच कारभार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थ करत असून लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी आणि कारवाईची मागणी ग्रामस्थ करणार असल्याचे समजते आहे.

