(चिपळूण/ वार्ताहर)
वहाळ जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी तसेच नागरिकांच्या स्थानिक समस्या आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लवकरच प्रभाग समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पंचायत समिती प्रशासन आणि संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याने नागरिकांना आपल्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होणार आहे.
या पार्श्वभूमीवर गटातील नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधा तसेच इतर विकासकामांशी संबंधित समस्या लेखी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांच्या नावे तातडीने सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रभाग समिती ही शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानली जाते. विविध विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहत असल्याने नागरिकांच्या अडचणींवर थेट चर्चा करून आवश्यक कार्यवाहीसाठी दिशा निश्चित केली जाते. त्यामुळे कोणतीही समस्या प्रलंबित न ठेवता ती वेळेत निवेदनाद्वारे मांडणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत बोलताना सौ. शिवानी संदीप सावंत म्हणाल्या, “प्रभाग समितीची बैठक ही केवळ आढावा बैठक नसून नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर प्रभावीपणे मांडण्याचे सक्षम व्यासपीठ आहे. गटातील प्रत्येक गावातील प्रश्न संबंधित विभागांच्या निदर्शनास आणून त्यावर कार्यवाही व्हावी, यासाठी नागरिकांनी बैठकीपूर्वी आपली निवेदने सादर करावीत. प्राप्त होणाऱ्या प्रत्येक निवेदनाचा गांभीर्याने विचार करून ते बैठकीत मांडण्यात येईल.”
“वहाळ जिल्हा परिषद गटातील एकही समस्या दुर्लक्षित राहू नये, हा माझा प्रयत्न आहे. नागरिकांनी वेळेत निवेदने सादर केल्यास त्यांचा प्रभावी पाठपुरावा करून संबंधित विभागांकडून कार्यवाहीसाठी प्रयत्न करण्यात येतील. विकासकामांना गती देण्यासाठी आणि जनतेच्या अडचणी मार्गी लावण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभागी व्हावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
नागरिकांच्या समस्या केवळ नोंदवून न ठेवता त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी, या उद्देशाने निवेदने बैठकीपूर्वी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वेळेत प्राप्त होणाऱ्या निवेदनांचा अभ्यास करून संबंधित विभागांसमोर ते प्रभावीपणे मांडण्यात येणार असून त्याचा सातत्याने पाठपुरावाही केला जाणार आहे.
निवेदन सादर करण्यासाठी संपर्क
विजय नेवरेकर – विभागप्रमुख, वहाळ मो. ९४०५८८४५७०, महेश पिलवळकर – विभागप्रमुख, निवळी मो. ९०२१३५२४५०, सुनील कदम – युवासेना विभागप्रमुख, वहाळ मो. ९६२३७७७१५२, चिराग सावंत मो. ९९२२२०४२१६

