(चिपळूण)
गेल्या दशकभरापासून विविध कारणांनी रखडलेल्या शहराच्या बहुचर्चित भुयारी गटार योजनेला अखेर गती देण्याच्या दिशेने नगरपरिषदेकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या वाई येथील गुरव असोसिएटकडूनच सुधारित आराखडा तयार करून घेण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या नगरपरिषदेच्या विशेष सभेत घेण्यात आला. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत येत्या वर्षभरात या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ व्हावा, यासाठी स्वतंत्र संयुक्त समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष सभेत भुयारी गटार योजनेच्या सुधारित आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराच्या विकासासाठी अत्यावश्यक मानल्या जाणाऱ्या या योजनेच्या रखडलेल्या अंमलबजावणीबाबत अनेक सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गुरव असोसिएटने यापूर्वी सादर केलेल्या आराखड्याबाबत वाद निर्माण झाले असले, तरी या संस्थेला आतापर्यंत सुमारे दीड कोटी रुपये अदा करण्यात आले असल्याने त्यांच्याकडूनच काम पूर्णत्वास नेण्याचा प्रस्ताव सभेत पुढे आला.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले की, यापूर्वी गुरव असोसिएटकडून आराखडा सादर करण्यात आला होता; मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी तत्कालीन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित पाठपुरावा झाला नाही. परिणामी हा महत्त्वाचा प्रकल्प वर्षानुवर्षे रखडला. आता मात्र अधिक वेळ न दवडता सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करून योजना तातडीने मार्गी लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सदस्य नरळकर यांनी योजनेसाठी आतापर्यंत मोठा निधी खर्च झाल्याचा मुद्दा उपस्थित करत, प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत गुरव असोसिएटला एकही रुपया अदा करू नये, अशी ठाम मागणी केली. या मागणीला सभेत पाठिंबा मिळाल्यानंतर कामाच्या प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अंतर्गत गटारांच्या कामांनाही प्राधान्य
सभेदरम्यान शहरातील अंतर्गत गटार व्यवस्थेचा मुद्दाही चर्चेत आला. यावर नगराध्यक्षांनी निधी उपलब्ध होताच विविध प्रभागांतील रखडलेली गटारांची कामे हाती घेतली जातील, असे सांगितले. तसेच ज्या भागांमध्ये अद्याप भुयारी गटार योजनेचा समावेश झालेला नाही, त्या भागांचे सर्वेक्षण करून भविष्यात त्यांनाही योजनेत सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सहा कोटींचा निधी
पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांतून नगरपरिषदेला लवकरच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या निधीतून शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती मिळणार असून सर्व प्रभागांमधील मूलभूत सुविधा उभारणीसाठी निधीचा प्राधान्याने वापर केला जाणार असल्याचे नगराध्यक्ष सकपाळ यांनी सांगितले. दशकभर प्रतीक्षेत असलेल्या भुयारी गटार योजनेबाबत नगरपरिषदेने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रकल्पाला नव्याने चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, आता प्रत्यक्ष काम कधी सुरू होते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

