(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे संगमेश्वर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संतोष सदानंद बोल्ये यांचे आज (शुक्रवारी, १७ एप्रिल) रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने वाशी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संतोष बोल्ये हे गावातील सन्माननीय ‘गावकर’ म्हणून परिचित होते. वाशी गावाच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते. ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. गावातील विविध सार्वजनिक उपक्रमांमध्ये तसेच शैक्षणिक संस्थांच्या कामात ते नेहमी पुढाकार घेत असत.
मनमिळावू स्वभाव आणि कार्यतत्पर वृत्तीमुळे त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वाशी गावावर शोककळा पसरली असून, एक संवेदनशील सहकारी आणि आपला माणूस हरपल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
त्यांच्या पश्चात परिवारासह मोठा आप्तस्वकीय वर्ग आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

