(रायगड / माणगाव)
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आज सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून एका विवाहित महिलेने स्वतः विष प्राशन करत आपल्या चार लहान मुलांनाही विषारी पेय पाजल्याची धक्कादायक घटना खरवली आदिवासी वाडी येथे उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेत आईसह दोन निष्पाप मुलींचा मृत्यू झाला असून एक मुलगा आणि एक मुलगी गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खरवली आदिवासी वाडी येथील आशा धर्मा जाधव (वय ३३) यांनी आज (शनिवार, दि. १३) रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास थंड पेयामध्ये मासे मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी औषध मिसळून ते स्वतः प्राशन केले. त्यानंतर त्यांनी आपल्या चार मुलांनाही तेच पेय दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. थंडपेय प्यायल्यानंतर काही वेळातच मुलांना आणि आईला उलट्यांचा त्रास होऊ लागला. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
या घटनेत आशा जाधव यांच्यासह दुर्वा जाधव (वय ७) आणि नंदिनी जाधव (वय ४) यांचा मृत्यू झाला. तर रवी जाधव (वय ८) आणि राजश्री जाधव (वय ४) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने सर्वांना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. आबासाहेब पाटणकर यांनी मुलांवर प्राथमिक उपचार केले. मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईकडे हलविण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून निर्माण झालेला मानसिक तणाव आणि नैराश्य हे या घटनेमागील कारण असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमके कारण काय होते आणि थंड पेयामध्ये कोणते विषारी द्रव्य मिसळण्यात आले होते, याचा तपास पोलीस करीत आहेत. संबंधित विषारी पदार्थाचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
दरम्यान, या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत असून विविध अंगांनी चौकशी सुरू आहे.
या अत्यंत वेदनादायी घटनेमुळे खरवली परिसरासह संपूर्ण माणगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

