(मुंबई)
हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारला माघार घ्यायला भाग पाडल्यानंतर आज ‘मराठी विजय मेळावा’ होणार आहे. विशेष म्हणजे, या मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तब्बल १९ वर्षांनंतर एका राजकीय व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हा भव्य मेळावा आज शनिवारी मुंबईतील वरळी डोम येथे पार पडणार असून, सकाळी ११.३० वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येथे आगमन करतील. या विजय मेळाव्यात सुप्रिया सुळे, प्रकाश रेड्डी, शेकापचे जयंत पाटील, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणे होणार आहेत. काँग्रेसचे नेते उपस्थित राहिल्यास त्यांनाही व्यासपीठावरून बोलण्याची संधी दिली जाणार आहे. मेळाव्याचे समारोपक भाषण उद्धव ठाकरे करतील.
त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना पहिल्यापासून हिंदी विषय अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही या आंदोलनात सहभागी होण्याचे जाहीर केले. मात्र, सरकारने निर्णय मागे घेतल्याने मोर्चा रद्द करण्यात आला आणि त्याऐवजी विजय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यातून ठाकरे बंधूंचे एकत्र शक्तिप्रदर्शन होणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील हे सहकार्य राजकीय घडामोडींना नवे वळण देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वरळी डोम परिसरात मेळाव्याच्या तयारीसाठी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरांवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे एकत्र फोटो झळकत असून, ‘गिरगावकर’ या संघटनेकडून काही बॅनरवर ‘जी मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले, त्यांनी परत मुंबईत ठाकरे बंधूंकडे या, नाहीतर थेट गुजरातला पोहोचाल’, अशा इशार्यांची भाषा वापरण्यात आली आहे. तसेच, ‘ब्रँड मराठीचा फक्त ठाकरेच – महाराष्ट्र माझा’ असे घोषवाक्यही या बॅनर्सवर पाहायला मिळत आहे. हे बॅनर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले असून, या मेळाव्यातून राज्याच्या राजकारणात मोठा संदेश दिला जाण्याची शक्यता आहे.

