(रत्नागिरी)
राजापूर शहरात पावसाळ्यात पावसाचे पाणी मुख्य बाजारपेठ परिसरात शिरत असल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. संभाव्य पूरस्थितीत नागरिकांना तातडीने मदत मिळावी, सुरक्षित स्थलांतर करता यावे आणि जीवितहानी टाळता यावी, या उद्देशाने राजापूर नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष आपत्कालीन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शहरातील वरची पेठ येथे बोट हाताळणी आणि जलतरणाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या तांत्रिक पद्धतींचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
प्रशिक्षण शिबिराला नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक अमित यादव, स्वच्छता निरीक्षक अमित पोवार, सहायक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील आणि श्री. खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत बोट हाताळणी, बचावकार्य आणि पूरनियंत्रणासंदर्भातील प्रशिक्षण घेतले.
लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व लक्षात घेऊन या प्रशिक्षणात लोकप्रतिनिधी, पोलीस दल आणि नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. नगरसेवक दिलीप अमरे, सिद्धांत जाधव, नगरसेविका आफरोज झारी, तसेच पोलीस मित्र आणि कर्मचारी राजन जाधव, सुशील यादव, गोपनीय पोलीस नरेश गुरव यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूर प्रशासन हायअलर्टवर असून, पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज करण्यात आली आहे. या प्रशिक्षणामुळे आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि प्रभावी मदतकार्य करणे अधिक सुलभ होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

