( दापोली )
दापोली-खेड मार्गावरील वाकवली-शिरशिंगे फाटा येथे आज (मंगळवार, दि. २८ जुलै) रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय सेजल पांडुरंग भागवत हिचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण वैष्णवी चंद्रकांत आयरे हिला किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेजल भागवत (वय २२, मूळ रा. टेटवली-खुटाचा कोंड, सध्या रा. विद्यापीठ चाळ, दापोली) आणि वैष्णवी आयरे (मूळ रा. असोंड, ता. दापोली, सध्या रा. विद्यापीठ चाळ, दापोली) या दोघी दुचाकीवरून दापोलीकडे येत असताना वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ दुचाकीचा ताबा सुटल्याने ती घसरली. त्यानंतर दुचाकीसह दोघीही रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळल्या.
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेची वाट न पाहता त्यांनी दोन्ही जखमी युवतींना स्वतःच्या वाहनातून दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून तत्परता आणि समयसूचकता दाखवली.
मात्र, अपघातात गंभीर जखमी झालेल्या सेजल भागवत हिच्या नाक-तोंडात पाणी गेल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. तर वैष्णवी आयरे हिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
या अपघाताचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

