(जाकादेवी / वार्ताहर)
मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासह व्यक्तींना स्वतःचे अंतर्मन समजून घेण्यासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी रत्नागिरीत ‘स्वदर्पण – अंतर्मनाचा आरसा’ या समुपदेशन, सायकोथेरपी व मानसशास्त्रीय मूल्यांकन केंद्राची सुरुवात करण्यात आली. या केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
मानसशास्त्रज्ञ स्वामिनी रवींद्र चव्हाण यांनी या केंद्राची स्थापना केली आहे. समाजात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, व्यक्तींना स्वतःच्या भावना आणि विचार समजून घेण्यासाठी मदत करणे, तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी अनुकूल दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामिनी चव्हाण यांच्या मातोश्री प्रियांका चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर स्वामिनी चव्हाण यांच्या आई-वडिलांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. रत्नागिरीतील प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शाश्वत शेरे, डॉ. श्री. व सौ. कल्पना सुधांशू मेहता, श्री. व सौ. मालती गणेश खवळे आणि श्री. तुकाराम चिखलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री. सुप्रियांतो खवळे यांच्या हस्ते थेरपी रूमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. श्री. व सौ. ज्योत्स्ना अतुल देशपांडे यांचीही उपस्थिती होती.
यावेळी मानसशास्त्रज्ञ स्वामिनी चव्हाण यांनी ‘स्वदर्पण’ केंद्र सुरू करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. केंद्रामार्फत समुपदेशन, ताणतणाव व नैराश्य व्यवस्थापन, थेरपी, करिअर मूल्यांकन, बुद्ध्यांक चाचणी (IQ Testing) आणि विविध कार्यशाळा अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सुदृढ मानसिक आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी हे केंद्र आशेचा नवा किरण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीत प्रशस्त आणि सुसज्ज जागेत व्यावसायिक दृष्टिकोनातून शास्त्रोक्त पद्धतीने समुपदेशन, सायकोथेरपी, ताणतणाव व नैराश्य व्यवस्थापन तसेच करिअर असेसमेंटसाठी हे केंद्र विकसित करण्यात आले आहे. या उपक्रमाचे स्वागत करत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी स्वामिनी चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यामध्ये रत्नागिरीतील प्रख्यात डॉ. विजय सूर्यगंध, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अतुल ढगे आणि डॉ. स्नेहल अंधारे, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य मकरंद साखळकर, उद्योजक राजेश शेट्ये, आर्किटेक्ट संजना शेट्ये, फिशरीज कॉलेजचे माजी डीन आशिष मोहिते, प्रा. स्वप्नजा मोहिते, डॉ. इंद्रनील जोशी, रत्नागिरीच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता दीपा सावंत, जागर नेटवर्कच्या चॅनेल हेड विभा कदम, रत्नागिरी तालुका विज्ञान मंडळाच्या उपाध्यक्षा संघमित्रा कुरतडकर, सचिव इम्तियाज सिद्दिकी, खजिनदार अभिजीत जोशी आणि सदस्या कविता ठाकरे यांच्यासह अनेक शिक्षक व शुभचिंतकांचा समावेश होता.
मानसिक आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि समुपदेशनाच्या माध्यमातून व्यक्तींना स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘स्वदर्पण’ केंद्राच्या पुढील वाटचालीसाठी उपस्थितांनी स्वामिनी चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.
फोटो : ‘स्वदर्पण’ मानसशास्त्रीय मूल्यांकन व समुपदेशन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी संस्थापिका स्वामिनी चव्हाण यांच्यासमवेत त्यांचे नातेवाईक, हितचिंतक आणि डॉक्टरवर्ग.


