(संगमेश्वर / एजाज पटेल)
“डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचं असेल तर इंग्रजी माध्यमातच शिकावं लागतं,” असा समज आजही समाजात खोलवर रुजलेला आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील एका मराठी माध्यमातील विद्यार्थ्याने आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हा समज खोटा ठरवला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लिपिक हेमंत दराडे यांचे सुपुत्र रोहन हेमंत दराडे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठेची मानली जाणारी एमबीबीएस पदवी यशस्वीपणे संपादन केली आहे. विशेष म्हणजे अंगणवाडीपासून बारावीपर्यंतचे त्यांचे संपूर्ण शिक्षण ग्रामीण भागातील मराठी शाळांमधून झाले आहे.
दराडे कुटुंब मूळचे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील रामेश्वर गावचे. नोकरीच्या निमित्ताने हेमंत दराडे अनेक वर्षांपूर्वी रत्नागिरी येथील फुणगूस येथे स्थायिक झाले. फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रात लिपिक म्हणून काम करताना त्यांनी कुटुंब सांभाळत मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. लहानपणापासूनच रोहन आरोग्य केंद्रातील वातावरणात वाढला. ग्रामीण भागातून उपचारासाठी येणारे रुग्ण, डॉक्टरांची सेवा आणि वडिलांची प्रामाणिक कामाची धडपड पाहताना त्याच्या मनातही डॉक्टर होण्याचे स्वप्न रुजले.
शासकीय नोकरीमुळे वडिलांच्या सतत बदल्या होत राहिल्या आणि त्यासोबत रोहनच्या शाळाही बदलत गेल्या. मात्र प्रत्येक टप्प्यावर त्याची खरी ताकद ठरली ती मराठी भाषा. रोहनने सुरुवातीचे शिक्षण फुणगूस येथील अंगणवाडी आणि मराठी शाळेत घेतले. त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३, दत्तनगर-देवरुख येथे पूर्ण केले. पुढे पाचवी ते दहावीचे शिक्षण सौ. मीनाताई ठाकरे हायस्कूल, सडवली येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय, खर्डा येथे प्रवेश घेतला आणि बारावीपर्यंतचा शिक्षणप्रवासही मराठी माध्यमातूनच पूर्ण केला.
ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये शिक्षण घेत असतानाच रोहनचा अभ्यासाचा पाया अधिक मजबूत होत गेला. “ज्ञान हे माध्यमावर अवलंबून नसून समजून घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते,” हा विश्वास त्याने कायम जपला. बारावीनंतर डेरवण वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळाल्यानंतर सुरुवातीला इंग्रजी भाषेतील वैद्यकीय अभ्यासक्रम मोठे आव्हान ठरले. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याला दुप्पट मेहनत घ्यावी लागली. पण मराठी माध्यमातून मिळालेला भक्कम पाया, अभ्यासाची सवय आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे आव्हानही यशस्वीपणे पेलले.
अखेर वर्षानुवर्षांच्या अथक परिश्रमानंतर रोहनच्या नावापुढे ‘डॉ.’ ही ओळख जोडली गेली. फुणगूस आरोग्य केंद्रात कागदपत्रे हाताळणाऱ्या एका प्रामाणिक कर्मचाऱ्याचा मुलगा आता गळ्यात स्टेथॉस्कोप घालून रुग्णसेवेसाठी सज्ज झाला आहे. मराठी शाळेतूनही मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात, याचे जिवंत उदाहरण म्हणून डॉ. रोहन दराडे यांच्याकडे पाहिले जात आहे.
त्यांच्या या यशाबद्दल रत्नागिरी जिल्ह्यासह मूळ गाव धाराशिव परिसरातूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मराठी शाळा, ग्रामीण शिक्षण व्यवस्था आणि मायबोलीच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ही घटना प्रेरणादायी ठरत आहे.
“माझ्या मायबोलीनेच मला विचार करण्याची ताकद दिली”
“डॉक्टर होण्यासाठी इंग्रजी माध्यमच आवश्यक असते, असा अनेकांचा समज आहे. पण माझा संपूर्ण शैक्षणिक पाया मराठी माध्यमातूनच घडला. मायबोलीने मला समजून घेण्याची, विचार करण्याची आणि कष्ट करण्याची ताकद दिली. इंग्रजी ही फक्त एक भाषा आहे; ज्ञानाचे मोजमाप नाही. वडिलांना आरोग्य केंद्रात काम करताना पाहून लहानपणी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले. हे यश माझ्या आई-वडिलांच्या कष्टांना आणि माझ्या मराठी शाळेला समर्पित आहे.”
— डॉ. रोहन हेमंत दराडे

