( खेड )
तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील दीपक नोव्हाकेम केमिकल कंपनीतून तब्बल २ लाख ४५ हजार रुपये किमतीची वजनमापे चोरी करणाऱ्या आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली आहे. संजय सितपराव (वय ४०, रा. रायगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीस गेलेली २० किलो वजनाची २२१ वजनमापे जप्त करण्यात आली आहेत. तसेच चोरीचा माल वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला सुमारे १० लाख रुपये किमतीचा मालवाहू टेम्पोही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
लोटे MIDC परिसरातील दीपक नोव्हाकेम कंपनीतून २० किलो वजनाची वजनमापे चोरीस गेल्याची तक्रार एप्रिल महिन्यात खेड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. चोरीचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक माहिती, हालचाली आणि विविध शक्यतांची पडताळणी करत अखेर आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस आणि पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले तपास करत होते. पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले आणि पोलीस शिपाई विजेंद्र सातार्डेकर यांनी चोरीचा छडा लावण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली २२१ वजनमापे हस्तगत केली असून, माल वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पोही जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचा इतर चोरीच्या घटनांमध्ये सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीत घडलेल्या या चोरीच्या घटनेचा उलगडा करण्यात खेड पोलिसांना यश आल्याने औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी समाधान व्यक्त केले आहे.

