(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जाकी मिऱ्या येथील आनंदनगर कॉलनी परिसरातील माळरानावरील जंगलात लागलेल्या आगीत लाकूड गोळा करण्यासाठी गेलेल्या महिला आणि नेता भिकाजी जाधव (वय ६५) या गंभीररीत्या होरपळल्या. ही घटना समजताच सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचारात व्यस्त असलेले उमेदवार आदेश उर्फ अबू भाटकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ प्रचार थांबवून घटनास्थळी धाव घेतली.
आदेश उर्फ अबू भाटकर यांच्यासोबत मयुरेश पाटील, सौ. पाटील तसेच प्रचारासाठी उपस्थित असलेल्या सर्व महिला व सहकारी राधिका राजेंद्र जाधव, सावी जाधव, मैथिली जाधव, गौतम पवार आदींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत कोणताही विलंब न करता जखमी महिलेला आपल्या प्रचार वाहनातून तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या घटनेत प्रचारापेक्षा माणुसकीला प्राधान्य देत उमेदवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता हीच त्यांच्या सामाजिक बांधिलकीची आणि खऱ्या नेतृत्वाची नांदी असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. आनंदनगर येथील रहिवासी तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संपर्क प्रमुख राजू जाधव यांनी या तातडीच्या मदतीबद्दल आदेश उर्फ अबू भाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत.
दरम्यान, घटनास्थळी जिल्हा परिषद उमेदवार सौ. आस्था धांगडे, त्यांचे पती अमित धांगडे तसेच त्यांच्या महिला सहकारीही उपस्थित होत्या. याशिवाय आनंदनगरचे सुधीर उर्फ आवलू जाधव, सुशांत जाधव, अक्षय जाधव, आशिष पवार, राकेश जाधव, अमिता जाधव आणि इतर सहकारी यांनीही घटनास्थळी मदतीसाठी उपस्थिती लावली. या प्रसंगातून सामाजिक जाणीव, तत्काळ कृती आणि मानवी मूल्यांचे दर्शन घडले असून, संकटाच्या क्षणी एकजुटीने उभे राहण्याचा आदर्श आनंदनगर परिसरात पाहायला मिळाला.

