( पुणे )
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश करत मुख्य सूत्रधार सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे याला अटक केली आहे. दुबई आणि थायलंडमधून सायबर गुन्ह्यांचं जाळं चालवणाऱ्या काळेला इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीस आणि लुकआऊट सर्कुलरच्या मदतीने थायलंडमधील बँकॉक विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्याला भारतात आणून मुंबई विमानतळावर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली.
देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ऑनलाइन टास्क फ्रॉड प्रकरणाच्या तपासातून या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा उलगडा झाला. जून २०२४ मध्ये या प्रकरणात पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली होती. मात्र तपासादरम्यान संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार गणेश काळे असल्याचं निष्पन्न झालं. तो दुबईत राहून भारतासह इतर देशांतील सायबर फसवणुकीचे व्यवहार नियंत्रित करत होता.
सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास, आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी आणि आंतरराष्ट्रीय यंत्रणांशी समन्वय साधत आरोपीचा शोध सुरू ठेवला होता. तपासात गणेश काळे याने दुबईमध्ये स्वतंत्र कार्यालय उभारून सायबर गुन्ह्यांचं मोठं नेटवर्क तयार केल्याचं उघड झालं. त्याचे चीनसह इतर विदेशी नागरिकांशी थेट संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी भारतातील नागरिकांना मोठ्या आर्थिक फायद्याचं आमिष दाखवून त्यांच्या नावावरील बँक खाती, एटीएम कार्ड, चेकबुक आणि इंटरनेट बँकिंगची माहिती मिळवत होता. या खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांसाठी केला जात होता.
ऑनलाइन टास्क फ्रॉड, शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचं आमिष, डिजिटल अरेस्टसारख्या विविध पद्धतींनी नागरिकांची फसवणूक करण्यात येत होती. या रॅकेटचा संबंध अनेक मोठ्या सायबर गुन्ह्यांशी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हिंजवडी परिसरातील १८ लाख रुपयांच्या फसवणुकीसह सायबर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या तब्बल २ कोटी ६६ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणांमध्येही आरोपीचा सहभाग असल्याचं तपासात समोर आलं आहे.
दुबईहून बँकॉकला पळाला, पण अखेर अटक
सप्टेंबर २०२५ मध्ये गणेश काळे दुबईहून थायलंडमधील बँकॉक येथे पळून गेला होता. मात्र पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी सातत्याने पाठपुरावा करत इंटरपोल आणि संबंधित यंत्रणांच्या मदतीने त्याच्यावर नजर ठेवली. अखेर अचूक नियोजन आणि आंतरराष्ट्रीय समन्वयाच्या जोरावर त्याला बँकॉक विमानतळावर पकडण्यात यश आलं.
या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीविरोधातील लढ्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना मोठं यश मिळालं असून, या रॅकेटशी संबंधित आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

