(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
बदलती जीवनशैली, जन्मजात व्याधी, अनुवांशिक कारणे आणि पोषणातील कमतरता यामुळे बालवयातच गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत गेल्या दीड वर्षांत ३४ बालकांमध्ये हृदयविकाराचे निदान झाले असून, त्यापैकी २८ बालकांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. उर्वरित सहा बालकांच्या उपचार व शस्त्रक्रियेची प्रक्रिया सुरू आहे.
बालकांमधील गंभीर आजारांचे वेळेत निदान आणि उपचार यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कालावधीत हृदयविकारासह विविध गुंतागुंतीच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या २८३ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर एकूण ३८३ बालकांना विविध प्रकारच्या उपचारांद्वारे नवजीवन देण्यात यंत्रणेला यश आले आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, बालकांमध्ये केवळ किरकोळ आजारच नव्हे तर जन्मजात हृदयविकार, हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स, दुभंगलेले ओठ आणि टाळू यांसारख्या गंभीर व्याधींचे प्रमाणही वाढत आहे. या आजारांचे वेळेत निदान न झाल्यास पुढील आयुष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणेदरम्यान मातेला पुरेशा प्रमाणात पोषण न मिळणे, काही गंभीर आजारांचा प्रभाव, अनुवांशिक व जनुकीय दोष, वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेतली जाणारी औषधे तसेच वाढते प्रदूषण आणि बदलती जीवनशैली ही बालवयातील हृदयविकार वाढण्यामागील प्रमुख कारणे आहेत.
वेळेत निदान झाले तर उपचार यशस्वी
लहान वयात शरीराची वाढ जलद गतीने होत असल्याने अशा आजारांचे वेळेत निदान झाल्यास शस्त्रक्रिया आणि उपचार अधिक प्रभावी ठरतात. आरबीएसके अंतर्गत जन्मजात हृदयातील छिद्रे, झडपांचे विकार, दुभंगलेले ओठ व टाळू, हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स, गुप्तांगांचे दोष, मोतीबिंदू तसेच तिरळेपणा यांसारख्या गंभीर आजारांवर पूर्णपणे मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आरोग्य विभागाने पालकांना मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता कोणतीही शारीरिक समस्या किंवा लक्षणे दिसून आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे. बालकांच्या निरोगी भविष्यासाठी वेळेवर निदान आणि उपचार हेच सर्वात प्रभावी औषध असल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे.

