(मुंबई)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः कोकणातील काही भागांसह मुंबई, पालघर, पुणे, नाशिक आणि घाटमाथा परिसरात जोरदार पावसामुळे नागरिकांना मोठा फटका बसला. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील पावसाबाबत नवा अंदाज जाहीर केला असून, उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, 16 आणि 17 जुलैदरम्यान राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचे पुनरागमन होऊ शकते, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
गेल्या काही दिवसांत नाशिक, पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. तर कोकण किनारपट्टी, पुणे आणि कोल्हापूर या भागांसाठी यलो अलर्ट लागू करण्यात आला होता. या काळात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली असून, काही भागांत पूरस्थितीही निर्माण झाली.
दोन दिवस पावसाची तीव्रता कमी राहणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहील. कोकणासह काही राज्यात काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील, तर उर्वरित ठिकाणी पावसाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही सध्या तुलनेने समाधानकारक परिस्थिती असली, तरी अनेक भागांत अद्याप पावसाची मोठी तूट कायम आहे.
गेल्या काही दिवसांत घाटमाथा परिसरात अतिवृष्टी झाली असून, लोणावळा आणि ताम्हिणी परिसरात 500 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धबधबे, नद्या आणि जलाशय तुडुंब भरले असून, काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या.
16-17 जुलैला पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, सध्या पावसाची सक्रियता कमी होणार असली तरी 16 आणि 17 जुलैदरम्यान बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो.
हवामान अभ्यासकांच्या मते, सध्या अफगाणिस्तानच्या दिशेने येणारे कोरडे वारे गुजरातमार्गे महाराष्ट्रात पोहोचत आहेत. या वाऱ्यांमुळे वातावरणातील आर्द्रता कमी होत असून, मान्सूनचे ढग तयार होण्यास अडथळा निर्माण होत आहे. याशिवाय प्रशांत महासागरातील ‘एल निनो’चा प्रभाव अधिक तीव्र होत असल्याने अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टीवरील मान्सून प्रणाली कमकुवत झाली आहे. त्यामुळे 20 जुलैपर्यंत पावसात खंड पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर वातावरणात पुन्हा अनुकूल बदल झाल्यास राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

