(रत्नागिरी)
सहा महिन्यांपूर्वी शहरानजीकच्या एमआयडीसी येथील वाहनांच्या दोन शोरूम फोडून ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या संशयिताच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुजरातमध्ये आवळल्या. मुरली मनोहर पवार (वय २१, रा. उमरगाम, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
दि. ८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७ ते ९ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. कालावधीत अज्ञाताने शहरानजीकच्या मोरजोळे एमआयडीसी येथील टाटा मोटर्स आणि मारुती जागृत मोटर्स ही दोन कार शोरुम फोडून तेथील रोख रक्कम आणि लॅपटॉप असा एकूण ७४ हजार ७५० रुपयांचा ऐवज लांबवला होता. या बाबत अरुण अशोक देशपांडे (रा. एकता मार्ग मारुती मंदिर, रत्नागिरी) यांनी याबात ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, अरुण देशपांडे हे मिरजोळे येथील टाटा मोटर्स शोरुमध्ये नोकरीला आहेत. सोमवार ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वा. कालावधीत अज्ञाताने टाटा शोरुमच्या पुढील दर्शनी काचेच्या दरवाजाचे कुलूप कोणत्यातरी हत्याराचे उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर शोरुममधील कॅशिअर केबीनच्या ड्राव्हरमधील रोख रक्कम चोरुन नेली. त्यानंतर चोरट्याने आपला मोर्चा मारुती जागृत मोटर्सकडे वळवून तेथील स्लायडिंग खिडकी उघडून त्यावाटे शोरुमधील १ लॅपटॉप व रोख रक्कम असा दोन्ही शोरुममधील एकूण हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. या प्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात भा. दं. वि. कायदा कलम ४५४,४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून समांतर तपास सुरु होता.
दरम्यान, या चोरीतील संशयित हा गुजरातमध्ये असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी एक पथक गुजरातला रवाना केले होते. ही कारवाई पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, पोलिस उपनिरीक्षक गावडे, पोलिस हेड काँ. शांताराम झोरे, नितीन ढोमणे, गणेश सावंत, विजय आंबेकर यांनी केली.