(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने सुरू आहे. तळमजल्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून सभागृहाचे कामही प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या मजल्याचे काम बाकी असले तरी १२,००० चौ. फुट एफ.एस.आय.वर आधारित दुमजली इमारतीसाठी आवश्यक परवानगी वाचनालयाला प्राप्त झाली आहे. आतापर्यंत सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र संपूर्ण प्रकल्पासाठी आणखी निधीची आवश्यकता होती.
याच पार्श्वभूमीवर पुण्याचे उद्योगपती श्री. अरुण जोशी यांच्याशी संपर्क झाला. त्यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या ‘मायदेश फाऊंडेशन’ने या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी पुढे येत १ कोटी ५० लाखांचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
इतिहास-संस्कृती जपणारी संस्था
मायदेश फाऊंडेशनने यापूर्वी भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, स्वा. सावरकर सेवा केंद्र, विलेपार्ले यांसारख्या ऐतिहासिक संस्थांचे नूतनीकरण केले आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा, संगणक सुविधा, शंकर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार यांसारख्या अनेक प्रकल्पांमधून राष्ट्रीय वारशाचे जतन केले आहे.
समर्पित संचालक मंडळ
फाऊंडेशनच्या संचालक मंडळावर प्रथितयश व अनुभवी व्यक्ती असून त्यांचा कल इतिहास, कला व शिक्षण क्षेत्राकडे आहे. याच समर्पणातून त्यांनी वाचनालयाच्या पुनर्बांधणीसाठी थेट योगदान देण्याचा निर्णय घेतला.
नव्या युगातील वाचनालयाचे स्वरूप
वाचनालय आधुनिक आणि अद्ययावत करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जाणार आहेत :
- मायदेश डिजिटल लायब्ररीची उभारणी
- दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटायझेशन
- आधुनिक सभागृह आणि स्वा. सावरकर कम्युनिटी सेंटर
- सोलर पॅनलद्वारे ऊर्जा स्वावलंबन
- लिफ्ट व परिसराचे सुशोभीकरण
स्वप्नपूर्तीचा टप्पा
गेल्या ३० वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर वाचनालयाचा संपूर्ण प्रकल्प आता पूर्णत्वास जाणार आहे. ग्रंथसंपदेचे जतन करत हे वाचनालय पुन्हा एकदा सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र म्हणून उजळून निघेल, असा विश्वास वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
ऑक्टोबरमध्ये शुभारंभ
१० ते २० ऑक्टोबर २०२५ दरम्यान वाचनालयाच्या तळमजल्याच्या उद्घाटनाचा सोहळा होणार असून श्री. अरुण जोशी व मायदेश फाऊंडेशनचे सहकारी या प्रसंगी रत्नागिरीत उपस्थित राहणार आहेत.

