(तरवळ/ अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड दुर्गवळीवाडी येथील व मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रुती संजय दुर्गवळी हिने भूगोल विषयात गोल्ड मेडल मिळवून सर्व प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
श्रुती संजय दुर्गवळी ही विद्यार्थीनी मालगुंड सारख्या ग्रामीण भागातील असून उच्चशिक्षणासाठी ती रत्नागिरी जिल्यातील नामांकित असलेल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात गेली तीन वर्षे पदवीचे शिक्षण घेत होती. तसेच भूगोल हा तिचा प्रमुख विषय पदवी साठी होता. आणि या विषयात तिने प्रचंड मेहनत घेऊन हे यश संपादित केले आहे. या निमित्ताने तिने दाखवून दिले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे.
शालेय स्तरापासून ही विद्यार्थीनी अभ्यासात हुशार होती, उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत ती रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड मध्ये कला शाखेत प्रथम आली होती. अभ्यासातील हे सातत्य तिने कायम ठेवून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अभ्यासाबरोबर ती क्रीडा क्षेत्रात देखील अग्रेसर आहे, महाविद्यालय स्तरावर असो किंवा विद्यापीठ स्तरावर असो तिने ॲथलेटिक्स मध्ये आपला दबदबा कायम ठेवला होता. गोगटे जोगळेकर महाविद्यालयायाने तिला सलग तीन वर्षे गोल्डन गर्ल म्हणून सन्मानित केले होते.
महाविद्यालयाच्या माध्यमातून ४ एप्रिल रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे डॉ. ज .श केळकर सेमिनार हॉल येथे प्रमुख अतिथी प्रो डॉ प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या दीक्षांत समारंभात तिला गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन,उपकार्याध्यक्ष ॲड विजय साखळकर, सचिव सतीश शेवडे, श्रीकांत दुदगीकर ॲड चंद्रशेखर केळकर प्राचार्य मकरंद साखळकर उपस्थित होते. श्रुती संजय दुर्गवळी हिने जे यश संपादित केले आहे त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले आहे.
श्रुती संजय दुर्गवळी हिने जे विद्यापीठ स्तरावर उल्लेखनीय यश मिळविले आहे त्या बद्दल तेच मालगुंड गावातून तसेच विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे, तसेच तिचे कौतुक देखील केले जात आहे.

