(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी घाटात दरड कोसळण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने वाहनचालकांची चिंता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी कोसळलेली दरड आणि माती पूर्णपणे हटविण्याचे काम सुरू असतानाच त्याच ठिकाणापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर पुन्हा मोठी दरड कोसळून डोंगरातील माती थेट महामार्गावर आली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून सध्या दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच मार्गिकेवरून सुरू ठेवण्यात आली आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे घाटातील दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. महामार्गावरील या संवेदनशील घाटातून दररोज हजारो लहान-मोठी वाहने प्रवास करीत असल्याने प्रत्येक नव्या दरडीमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहनचालकांकडून, घाटातील डोंगर कटाईचे काम योग्य तांत्रिक निकषांचे पालन न करता करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात माती सैल होऊन वारंवार रस्त्यावर कोसळत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे महामार्गाच्या सुरक्षिततेबाबत आणि कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच मार्गिकेवरून सुरू ठेवली आहे. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रवाशांनी निवळी घाटातून प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

